दिंड्यांविना यंदा त्र्यंबकच्या वाटा सुन्यासुन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 04:23 PM2021-02-04T16:23:41+5:302021-02-04T16:31:12+5:30
देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने यावर्षी दिंड्यांची संख्या घटली आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होत असल्या तरी त्यांनाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पायी दिंड्यांसह वारकरी, भक्तजण ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करीत त्र्यंबककडे मार्गक्रमण करतात. यात्रेच्या तीन-चार दिवस अगोदरच त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरण भावभक्तिमय होऊन जाते. टाळ-मृदुंगाच्या गजराने व माऊलीच्या भजनाने येथील रस्ते दुमदुमून जातात. तसेच रस्त्यांवरील गावामध्ये दिंड्या मुक्कामास थांबून तेथील वातावरण भक्तिमय करतात. यात स्थानिक नागरिकही सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे पंढरपूरसह आळंदीच्याही यात्रा रद्द झाल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवारपासून सुरू होत आहे. पण त्र्यंबकनगरीच्या वाटा मात्र यंदा सुन्याच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी ओसरत असला तरी खुल्या यात्रेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी गर्दी टाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ मंदिर परिसरात तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी अनेक दिंड्या यंदा रद्द करण्यात आल्या असल्याचे वारकरी सांगत आहेत. मात्र, वारीची परंपरा अखंडित राहावी म्हणून दिंडीतील काही मोजकेच वारकरी देवगांवमार्गे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.
वारकरी मंडळींचा प्रतिसाद
यात्रेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी वारकरी दर्शन घेऊन मुक्कामास न राहता लगेचच परततांना दिसत आहेत. रस्त्याने जाताना वारकऱ्यांसाठी स्थानिक होतकरू सांप्रदायिक नागरिक फळे व जेवणाची व्यवस्था करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे जाणाऱ्या दिंड्या आज तुरळक वारकऱ्यांनी दिसत आहेत. दिंडीत फार तर पाच सहाच वारकरी दिसतात. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या तीन-चार दिवसांपूर्वी दिंडी सोहळ्याची गर्दी खूप असते. यंदा मात्र, दिंडी सोहळे तुलनेत कमी आहेत.
- इंदूबाई रोकडे, वारकरी, देवगांव