काम न करताच नाशिकमध्ये ठेकेदाराला चौदा लाख रूपयांचे देयक अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:32 PM2017-12-02T14:32:43+5:302017-12-02T14:35:45+5:30
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी याकामाचे पैसे गोळा केले आहेत.
नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणा-या ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ध्वनीचित्र फितीने व्हायरल झाल्याने या संदर्भात पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. दुसरीकडे काम न करताच, ठेकेदाराला चौदा लाख रूपये अदा करण्याची जिल्हा पुरवठा खात्याची भुमिकाही संशयाच्या फे-यात सापडली आहे.
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी याकामाचे पैसे गोळा केले आहेत. दुकानदारांनी पैसे देऊनही ठेकेदाराने सदोष कामे केल्याच्या तक्रारी आहेत. आधारक्रमांक चुकीचा टाकणे, पुरेसे नंबर न टाकणे, कोणाचा आधार दुस-यालाच जोडणे अशा अनेक प्रकारामुळे शिधापत्रिकाधारकांनी आधारक्रमांक रेशन दुकानदाराला देऊनही त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे ठेकेदाराने काम न करताच तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिका-यांनी त्याला चौदा लाख रूपयांचे देयक अदा केले आहे म्हणजे एकाच कामासाठी ठेकेदाराला दोन वेळा पैसे अदा करण्यात आल्यामुळे या सा-या प्रकरणात काही तरी काळबेरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा ठेकेदाराकरवी सदरचे काम केले जात असून, त्यासाठी सतरा लाख रूपयांची तरतूद असल्याचे सांगितले जात असताना शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक शेख हे दुकानदारांकडून पैशांची मागणी करीत असल्याची ध्वनीचित्रफित फेसबुकवर व्हायरल झाल्याने या संदर्भात शंका घेण्यास अधिक वाव निर्माण झाला आहे. मुळात आधारक्रमांक जोडण्यासाठी पुरवठा खात्याकडून रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार यापुर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सचिव महेश पाठक यांच्याकडे करण्यात आली, त्यांच्याकरवी चौकशीच्या सुचना देण्यात आल्या आहेत, परंतु पुढे काहीच झाले नाही.