नाशिक जिल्ह्यात अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिका आधार लिंकविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 08:19 PM2017-10-27T20:19:07+5:302017-10-27T20:26:08+5:30
नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थीसह अन्य योजनेअंतर्गत एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या 7 लाख 56 हजार 627 इतकी आहे. यात अंत्योदय बीपीएल व के शरी शिधापत्रिकांतून प्राधान्यक्रमाचे लाभाथ्र्याचा समावेश असून, यापैकी 5 लाख 10 हजार शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहेत. उर्वरित 2 लाख 25 अद्यापही आधारकार्डाशी लिंकिंग झालेले नाही. जिल्ह्यात महिन्याला सरासरीत 25 ते 30 हजार शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असून, या गतीनेच संलग्नीकरणाचे काम सुरू राहिल्यास संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया जवळपास सहा ते सात महिने चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात एकूण साडेसात लाख शिधापत्रिका असून, पाच लाख शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. परंतु अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तींचे काम सुरू आहे. परंतु याचा धान्य पुरवठय़ावर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व 7 लाख 56 हजार 627 लाभाथ्र्याना पुरवठा करण्यात येत आहे. यात आधार लिंक नसलेल्या, परंतु लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.