धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही - बैजू पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:02 PM2017-10-01T22:02:02+5:302017-10-01T22:10:13+5:30
नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी गरजेचा ठरतो, असे मत प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत मागील दोन वर्षांपासून ‘गाथा जंगलाची’ हा आगळावेगळा व निसर्गाची ओळख व अस्तित्वाची जाणीव करुन देणारा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत रविवारी (दि.१) परशुराम सायखेडकर सभागृहात पाटील यांची प्रकट मुलाखत पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी घेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून नाशिककर निसर्गप्रेमींना जंगलाची अद्भूत सफर घडविली. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार बिभास अमोणकर, अतुल धामणकर, भास भामरे, सारंग पाठक, मविप्रच्या सरचिटणीस नीलीमा पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, औरंगाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात लहानाचा मोठा झालो. लहानपणी येथे पर्यटनासाठी येणाºया परदेशी पाहुण्यांचे कॅमेºयांचे कुतुहल वाटत होते. या कुतुहूलापोटी आक र्षण निर्माण झाले आणि छायाचित्रणाकडे वळलो. निसर्ग हाच आपला गुरू मानत प्रवास सुरू केला आणि माझ्या छायाचित्रांना नागरिकांनी पसंत केले हे मी माझे भाग्य समजतो; मात्र पंचवीस वर्षांच्या या प्रवासात अद्यापही एक चांगले उत्कृष्ट छायाचित्र मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
वन्यजीव छायाचित्रण करण्यासाठी संयम, प्रसांवधान, कौशल्य हे गुण विकसीत करावेच लागतात; मात्र त्यासोबत विविध पक्षी, प्राणी व जंगलांचा सुक्ष्म अभ्यासही महत्त्वाचा ठरतो. कारण प्राणी-पक्ष्यांची जीवनशैली माहित करुन घेतल्याशिवाय त्यांचे क्रियाशिल छायाचित्र टिपणे अशक्य गोष्ट आहे. वन्यजीव व निसर्गाच्या छायाचित्रणासाठी भारतासारखा दुसरा सुंदर देश नाही. कारण या देशात जंगल, वाळवंट, हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश, समुद्र सर्व काही उपलब्ध आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्लाईड-शोच्या माध्यमातून जंगलाचा प्रवास उपस्थितांनी अनुभवला.