मयतांनाच दाखविले साक्षीदार
By admin | Published: February 10, 2016 11:06 PM2016-02-10T23:06:38+5:302016-02-10T23:24:30+5:30
चमत्कार : मालेगाव तहसीलच्या जबाबपत्रात नोंद
प्रवीण साळुंके मालेगाव
येथील तहसील खाते भ्रष्टाचार व विविध कारणांनी मागील तीन ते चार वर्षात राज्यात चांगलेच बदनाम झाले आहे. या कार्यालयाचे अनेक चमत्कार असून, असाच प्रकार तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाच्या जबाबात संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. यात तहसीलच्या जबाबाच्या कागदपत्रात दोन व्यक्ती मयत असूनही त्यांचे प्रत्यक्षदर्शी जबाब असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाविषयी अनेक तक्रारी असल्याने परवाना रद्द करण्यात आला होता. यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशावर ४ डिसेंबर २०१५ला पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात संशय घेण्यास अनेक जागा आहेत. मिळालेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रात घेण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातील व्यक्तींपैकी एक व्यक्ती ६ एप्रिल २००८ तर दुसरी व्यक्ती ८ मे २०१३ रोजी मयत झाल्याची ग्रामपंचायतीत नोंद आहे. तरीही त्यांनी प्रत्यक्ष जबाब दिलेल्यांमध्ये त्यांचे नाव आहे. या जबाब देणाऱ्यात एक व्यक्तीच्या नावापुढे ग्रामपंचायत सदस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांमध्ये त्याचे नाव नाही. यातील एका जबाबावर स्वाक्षरी नाही, तसेच एकात प्रत्यक्षदर्शीचे नाव व स्वाक्षरी यांच्यात मोठी तफावत आहे. एका जबाबात मनुष्याच्या नावापुढे महिलेची सही असून, दोन जबाबावर एकाच व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या आहेत तर एका जबाबात नाव व शिधापत्रिका क्रमांक यात तफावत आहे. हा पंचनामा घाईघाईत करण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येते. या अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात एक हजार रुपये दंडाची शिफारस केली आहे. या अहवालात किरकोळ तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे.
सदर दुकानदारांविषयी अनेक तक्रारी असल्याने ग्रामपंचायतीने याविषयी चर्चा करण्यासाठी ग्रामसभेत ठेवला. त्यावर १९ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेत चार क्रमांकाच्या विषयात धान्य वाटपाच्या तक्रारीवर चर्चा करण्यात येऊन परवाना रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.
सदर ठरावावर तहसीलदारांनी यावर ४ सप्टेंबर २०१५ रोजी पुरवठा निरीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला
होता. त्यांनी १५ सप्टेंबर २०१५
रोजी पंचनामा करून दिलेल्या अहवालात परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यावर
२ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात येऊन गावाचे धान्य वाटप खडकीच्या दुकानदाराला तात्पुरत्या स्वरूपात दिले होते.