पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेला मारहाण; एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:21 PM2020-08-07T22:21:15+5:302020-08-08T01:02:59+5:30
अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेस आवारातच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून दुसरा फरार झाला आहे.
पिंपळगाव बसवंत : अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेस आवारातच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून दुसरा फरार झाला आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार सोमवारी महिलांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांकडून संबंधित महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार सुरु झाला होता. मंगळवारी पुन्हा काही महिला दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. ते समजताच दोन तरूणांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन महिलांना धमकावले. त्यातील एका तरूणाने महिलेला मारहाण केली. त्यानंतर सदर महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकारामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी चंद्रकला वाघमारे या महिलेने केली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पिंपळगाव शहरातील शास्त्रीनगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्र ी होत असल्याने पोलीस प्रशासनास निवेदन देऊन सुद्धा कारवाई झाली नाही. अवैध धंदे करणाऱ्यांकडून महिला वर्गाला धमकवण्याचे व मारहाण करण्याचा प्रकार घडला. पोलीस प्रशासनाचेच त्यांना पाठबळ असल्याचा आरोप करीत पोलीस निरीक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
अवैध दारू विक्री प्रकरणी महिलांनी पोलिसांना निवेदन दिल्यावर तातडीने दखल घेत कारवाई करणे गरजेचे होते. पोलिसांनी कारवाई न केल्याने महिलेला पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण करण्यापर्यंत दारु विक्रेत्यांनी मजल गाठली आहे. आर्थिक तडजोडीमुळेच अवैध दारु विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आम्ही त्या महिलेच्या पाठीशी आहोत.
- गणेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र दारू बंदी जन आंदोलन समिती, पिंपळगाव