ट्रकच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:49 AM2020-08-14T00:49:34+5:302020-08-14T00:50:03+5:30
नाशिक - पुणे महामार्गावरील चेहेडीजवळ मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने दुचाकीवरून मार्गस्थ होणारे मायलेक दुचाकी घसरून खाली कोसळले. याचवेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात मुलगा बालंबाल बचावला.
नाशिकरोड : नाशिक - पुणे महामार्गावरील चेहेडीजवळ मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने दुचाकीवरून मार्गस्थ होणारे मायलेक दुचाकी घसरून खाली कोसळले. याचवेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात मुलगा बालंबाल बचावला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर येथील शिवाजीनगर कॉलनीमध्ये राहणारे आदेश अशोक उगले (२२) हे त्यांच्या आई अभिलाषा अशोक उगले (४७) यांना सोबत घेऊन ड्रीम युगा दुचाकीवरून (एमएच १५ ईसी ६७२८) नाशिकरोडकडे येत होते. यावेळी चेहेडी पंपिंग प्राइड इमारतीसमोर मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि खड्डे पडलेले असल्याने गाळामुळे आदेश यांची दुचाकी घसरली. यावेळी दोघेही मायलेक खाली कोसळले. आदेश यांनीही हेल्मेट परिधान केलेले होते; मात्र त्यांच्या आईच्या डोक्यात हेल्मेट नव्हते.
याचवेळी सिन्नर बाजूने नाशिककडे ट्रकचालक सुरेश अशोक कुमटकर (रा. धोंडपारगाव, जामखेड) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच १२ एनएक्स ५६९९) भरधाव वेगाने चालवत असताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याच्या ट्रकच्या चाकाखाली आदेश यांच्या आई अभिलाषा सापडून गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तेथील लोकांनी टेम्पोतून जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. आदेश यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिलाषा या जिल्हा व सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस होत्या. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.