सटाण्यात पतीसह दीराने महिलेला पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:08 AM2018-03-26T01:08:00+5:302018-03-26T01:08:00+5:30
पाच महिन्यांची गर्भवती पत्नी गर्भपात करण्यास नकार देते म्हणून पतीसह दीर व सासरा या तिघांनी संगनमताने पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास येथील अंबिकानगर येथे घडली.
सटाणा : पाच महिन्यांची गर्भवती पत्नी गर्भपात करण्यास नकार देते म्हणून पतीसह दीर व सासरा या तिघांनी संगनमताने पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास येथील अंबिकानगर येथे घडली. या घटनेत महिला पंचावन्न टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील पिंपळेश्वर परिसरातील अंबिकानगर ाधील रूपाली विलास कुमावत (२४) ही आपली मुले, पती विलास दशरथ कुमावत, दीर योगेश व सासरा दशरथ गंगाधर कुमावत समवेत वास्तव्यास आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी रूपालीला दिवस गेले तेव्हापासूनच घरात खटके होते. गर्भपात करत नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. दरम्यान, शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याच कारणावरून चौघांमध्ये जोरदार भांडण झाले. विलासने हातातील दांडक्याने रूपालीला बेदम मारहाण केली. त्यानंतर गर्भपात केला नाही तर तुला जाळून टाकू अशी धमकी देत विलासने रूपालीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दीर योगेशने पेटवून दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेत रूपाली ५५ टक्के भाजली असून, तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांत तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत.
पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ...
दशरथ गंगाधर कुमावत ,विलास, योगेश हे तिघे बापलेक बांधकाम ठेकेदार आहेत. गेल्या सात वर्षांपूर्वी विलास आणि रूपाली यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना तीन अपत्ये असून, पाच महिन्यांपूर्वी पुन्हा दिवस गेले. तीन महिन्यांची गर्भवती असतानापासून रूपालीकडे गर्भपात करण्यासाठी दमबाजी सुरू होती.
तिघे फरार, शोध सुरू
ही घटना उघडकीस आल्यानंतर रूपालीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालून तिघांना अटक करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी गंभीर दखल घेत रूपालीचे जाबजबाब घेऊन तत्काळ फिर्याद दाखल केली. घटनेनंतर तिघेजण फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध आहेत.