गोंदे फाट्याजवळ अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 12:58 AM2021-03-15T00:58:51+5:302021-03-15T00:59:30+5:30
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली .
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातांची मालिका सुरुच आहे.
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना झायलो कार क्रमांक (एम.एच.०५, बी.एल.३२०५) या गाडीला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक (यू.पी.९२,टि.८९९६) ने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पितांबर जगन्नाथ पाटील.(६५) रेखा कैलास पाटील (५०), ३) कैलास जगन्नाथ पाटील (५३, रा. सर्व वसई, मुंबई) हे जखमी झाले . यापैकी शशिकला पितांबर पाटील (६०) ही महिला उपचारादरम्यान मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले आहे. अपघात इतका भीषण होता की, अपघातात झायलो कारचा चक्काचूर झाला आहे. आठवडाभरात गोंदे दुमाला आणि वाडिव-हे दरम्यान लागोपाठ झालेल्या चार अपघातांमध्ये आत्तापर्यंत सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. अपघाताचा तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.