देवळाणे येथे भिंत पडून महिलेने जीव गमावला
By admin | Published: March 2, 2016 10:58 PM2016-03-02T22:58:19+5:302016-03-02T22:58:52+5:30
अंदरसूल परिसरात अस्मानी संकटाचा कहर; बैलजोडी ठार
अंदरसूल : परिसरातील देवळाणे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीने एका घराची भिंत पडून ९० वर्षीय जिजाबाई निवृत्ती काळे यांचा दुर्दैवी अंत झाला, तर खामगाव येथील शेतकरी रवींद्र शंकर आहिरे यांच्या ६० हजारांच्या बैलजोडीवर वीज पडून बैलजोडी जागीच ठार झाली व बैलांशेजारी बांधलेल्या गायीचे चारही पाय निकामी होऊन जखमी झाली.
सरकारच्या उदासीनतेमुळे शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भाव यामुळे बेजार झालेल्या बळीराजावर आता अस्मानी संकटाचा अवकाळी कहर सुरू झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
येवला तालुक्याच्या पूर्व भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिसरात चांगलेच थैमान घातले असून, अंदरसूल, खामगाव, गवंडगाव, बोकटे, देवळाणे, उंदीरवाडी आदि गावांसह परिसरातील खेड्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची असमानी संकटाने चांगलीच दमछाक झाली आहे. त्यात अवकाळीने घेतलेले रौद्र रूप बघून शेतकरी चांगलाच हताश झालेला असल्याचे चित्र आहे.
गवंडगाव शिवारातही अवकाळीने थैमान घातले असून, येथील शेतकरी सजन रामचंद्र गायकवाड यांच्या घराचे पत्रे उडून गेले, तर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कामगार तलाठी पी. एस. चोपडे यांनी पंचनामा करून गायकवाड यांचे ७७ हजार रु पयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे, तर मीना सुदाम भागवत यांच्या शेतातील घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून दूरवर जाऊन पडले त्यात त्यांचे ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
उंदीरवाडी शिवारातील राजाराम गोबजी गोराणे यांच्या घराच्या छताचेदेखील पत्रे उडाले असून, घराचेही मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. दरम्यान, देवळाणे येथील वृद्ध महिला जिजाबाई निवृत्ती काळे यांच्यासह खामगाव येथील बैलजोडीच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)