महिलेला पंचांसमोर नग्न अंघोळीची शिक्षा!
By Admin | Published: February 2, 2016 11:59 PM2016-02-02T23:59:06+5:302016-02-02T23:59:29+5:30
काळिमा : चारित्र्य सिद्ध करण्यासाठी नंदुरबारच्या जातपंचायतीचा फतवा
नाशिक : जातपंचायतीच्या अमानुष कारभाराची प्रचिती देणारी प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जातपंचायतीच्या या फतव्याने संताप व्यक्त होत असून, सदर महिलेने याबाबत नाशिक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
सदर तक्रार अर्जानुसार, मूळ ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील एका महिलेचा १७ डिसेंबर २००० रोजी नंदुरबार येथील युवकाशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुलेही झाली. सन २०१३ मध्ये तिच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यानंतर ही महिला मुलांच्या मदतीने पतीचे दुकान चालवून उदरनिर्वाह करीत होती. याच दरम्यान महिलेच्या मावस दीराने तिच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तिने नकार देताच मावस दीराने सासू व दीराकडे खोटे आरोप केले. त्यातून या महिलेस मारहाण झाली. याच दरम्यान समाज पंचकमिटीचे दीपक तमायचेकर, ज्ञानेश्वर गुमाने व कांती नेतले यांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन या प्रकरणाचा निवाडा जातपंचायतीत करण्याचा सल्ला दिला. तिला जातपंचायतीत बोलावण्यात आले. सासरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला, मारहाणही करण्यात आली.
त्यामुळे ही महिला ओझर येथे माहेरी राहू लागली. या दरम्यान ज्या परपुरुषाशी या महिलेचे संबंध असल्याचा जातपंचायतीत आरोप झाला, त्याने आधी नकार दिला व नंतर घूमजाव केले आणि महिलेशी आपले संबंध असल्याचे तो सांगू लागला. त्यावर पंचकमिटीने या महिलेला सांगितले की, एक वर्षानंतर रात्रभर तीनशे गोवऱ्या जाळून त्यात तीन किलोची कुऱ्हाड तापवली जाईल. ही कुऱ्हाड तुझ्या बारा वर्षांच्या मुलाच्या हातावर ठेवून त्याला सात पावले चालण्यास सांगितले जाईल. कुऱ्हाडीमुळे मुलाचे हात भाजल्यास तुझ्यावरील कलंक सिद्ध होईल आणि हाताला फोड न आल्यास चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध होईल
मात्र पंचांना न जुमानता ती महिला पुन्हा ओझरला निघून आली. त्यानंतरही पंच कमिटीकडून तिच्या वडिलांना सतत फोनवर धमक्या येऊ लागल्या. तुमची मुलगी कलंकित असून, कलंकाचे निवारण करण्यासाठी तिला पंचांसमोर संपूर्ण नग्न होऊन अंघोळ करावी लागेल, असा अघोरी उपाय सांगण्यात आला. हा प्रकार गेल्या २० सप्टेंबर २०१५ रोजीच होणार होता; मात्र त्या महिलेने पंचांना अद्याप जुमानलेले नाही. त्यामुळे तिला वारंवार धमक्या येत आहेत. नंदुरबार पोलिसांनी संबंधित पंचांकडून असा अमानुष प्रकार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असले, तरी पंचांकडून आग्रह सुरू असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जातपंचायत मूठमाती अभियानाचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी सदर प्रकरण उघडकीस आणले असून, या प्रकरणी पंचांवर कारवाईची मागणी होत आहे.
इन्फो :
असा आहे फतवा...
कथित कलंकित महिलेने पंचांसमोर संपूर्ण कपडे काढून पंचांनी दिलेल्या फक्त सव्वा मीटर कापडाने अंग झाकावे. अशा अवस्थेत तिने १०७ पावले चालावे. तिच्यासोबत दोन महिला असतील. त्यापैकी एक तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारील, तर दुसरी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल. यानंतर या महिलेला पंचांसमोरच दूध व पाण्याने अंघोळ करावी लागेल.
इन्फो :
कायदा होण्याची गरज
जातपंचायतीच्या कारभाराविरोधात लोक स्वत:हून पुढे येत आहेत; मात्र नेमक्या कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, याबाबत पोलिसांमध्येच संभ्रम आहे. जातपंचायतीच्या अमानुष, क्रूर कारभाराला रोखण्यासाठी जातपंचायतविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलावीत.
- कृष्णा चांदगुडे, कार्यकर्ते, अंनिस