लासलगावच्या जळीत महिलेने घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:12 AM2020-02-23T00:12:11+5:302020-02-23T00:28:30+5:30
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि.१५) लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत अंगावर पेट्रोल पडून गंभीररीत्या भाजलेल्या महिलेने शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुंबई येथील मसीना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेली सहा दिवस सुरू असलेला तिचा संघर्ष अखेर थांबला.
लासलगाव: येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि.१५) लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत अंगावर पेट्रोल पडून गंभीररीत्या भाजलेल्या महिलेने शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुंबई येथील मसीना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेली सहा दिवस सुरू असलेला तिचा संघर्ष अखेर थांबला. शनिवारी (दि. २२) सकाळी तिचे पार्थिव लासलगावी आणल्यानंतर ११.१५ वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पीडितेचे निधन झाल्याने पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी रामेश्वर भागवत याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या शनिवारी (दि. १५) लासलगाव बसस्थानकावर वादावादीतून झालेल्या झटापटीत बाटलीतील पेट्रोल अंगावर पडल्याने ६७ टक्के भाजली होती. त्यामुळे तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याच दिवशी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेत उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला रविवारी (दि. १६) पहाटे मुंबई येथील मसीना रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर सहा दिवसांच्या संघर्षानंतर शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री मालवली. मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सा केल्यानंतर तिचे पार्थिव लासलगाव येथे आणण्यात आले. नातेवाइकांच्या इच्छेनुसार, लासलगाव येथील अमरधाममध्ये सकाळी तिच्या पार्थिवावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीडितेच्या तीनही लहान मुलांसह नातेवाईक उपस्थित होते.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
पीडिता व संशयित यांच्या जबाबांची पडताळणी व तपास सुरू असून, पीडितेचे निधन झाल्याने मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत याच्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून पुराव्यानिशी सत्य शोधून काढले जाईल व संशयितास कडक शासन होईल यावर लक्ष दिले जाईल, असे यावेळी पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.
लासलगाव जळीत प्रकरणातील महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करू हीच या मातेसाठी श्रद्धांजली असेल.
- छगन भुजबळ, पालकमंत्री