जयभवानीरोड येथे सोनसाखळी चोरट्यास महिलेने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:07 AM2017-12-21T00:07:33+5:302017-12-21T00:33:35+5:30
नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक : नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. श्री तुळजा भवानी मंदिराकडून बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंदुराणी धनंजयकुमार सिंग (४२) या रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी पांढºया रंगाच्या प्लेजर स्कूटीवर आलेल्या चोरट्याने इंदुराणी यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून जबरी चोरी करून पळून जाऊ लागला. मात्र इंदुराणी यांनी लागलीच चोरट्याची स्कूटी गाडी पाठीमागून पकडली. मात्र इंदुराणी यांनी शेवटपर्यंत गाडी न सोडल्याने चोरटा गाडीसह खाली पडला व तेथून पळून गेला. इंदुराणी यांनी सदर घटनेची माहिती तत्काळ उपनगर पोलिसांना दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन व गस्त घालणारे पोलीस कर्मचारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्लेजर स्कूटीच्या क्रमांकावरून शोध घेत जयभवानीरोड येथील सोनसाखळी चोरटा संजय रघुनाथ म्हसदे (३७) याच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या. म्हसदे याच्याकडून इंदुराणी यांच्या गळ्यातील ओढलेले अर्धे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. तर दुसºया घटनेत चेहेडी येथील नीलिमा गणेश ताजनपुरे (३५) या स्कूटी गाडीवरून सामनगाव-चेहेडी रस्त्याने घरी जात होत्या. यावेळी पाठीमागून होंडा डिओ दुचाकीवर आलेल्या चोरट्या युवकाने चालत्या गाडीवर नीलिमा ताजनपुरे यांची पावणेदोन तोळे वजनाची ४० हजारांची सोन्याची पोत ओढून नेली.
चोरटा महिला पोलीस कर्मचाºयाचा भाऊ?
जयभवानीरोड येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून चोरून नेणारा संशयित संजय म्हसदे याची गाडी धाडसी महिला इंदुराणीने पकडून ठेवल्याने चोरटा खाली पडून पळून गेला. मात्र त्या दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हसदे याच्या मुसक्या आवळल्या. संशयित म्हसदे हा एका महिला पोलीस कर्मचार्याचा भाऊ असल्याची चर्चा आहे.