आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप
By admin | Published: September 6, 2014 11:06 PM2014-09-06T23:06:00+5:302014-09-07T00:10:35+5:30
आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप
नाशिक : दुचाकी वाहन खरेदी करून वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही वाहनाचे आरसी बुक तर मिळाले नाहीच शिवाय चौकशीकामी आरटीओ कार्यालयात गेलेल्या महिलेला धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला. आरटीओच्या सावळ्या गोंधळामुळे महिलेला मनस्ताप सहन करावा लागला असून, या प्रकारानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्यानंतरही दखल घेतली नसल्याने संबंधित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे.
देवळाली कॅम्प येथील अंजली संतोष महाले या महिलेने जून २०१३ मध्ये हीरो होंडा कंपनीची प्लेझर गाडी खरेदी केली. या दुचाकीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आरसी बुक तुमच्या पत्त्यावर येईल, असे सांगण्यात आले. परंतु दोन-तीन महिन्यांनंतर आरसी बुक न आल्याने महाले यांनी आरटीओत संपर्क साधला असता पत्ता चुकीचा टाकला गेला असे सांगून अर्ज मागितला व त्यावर सुदाम सूर्यवंशी या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्यास सांगितले. स्वाक्षरीसाठी सूर्यवंशी यांनी दिवसभर थांबून दुपारी सही केली व पत्ता बदललेला असल्याने ४५० रुपये भरावे लागेल व राहण्याच्या पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर जानेवारी २०१४ ला पुन्हा अर्ज करून रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्डची नक्कल कॉपी दिली व स्मार्ट कार्ड घरपोच येईल, असे सांगितले. मात्र स्मार्ट कार्ड न मिळाल्याने पुन्हा कार्यालयात चौकशी केली परंतु मिळाले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आरटीओत चौकशी केली असता पुन्हा अर्ज करून ४५० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार पुन्हा अर्ज करून रक्कम भरल्यावर खिडकी क्रमांक ४३ वर असलेल्या कर्मचाऱ्याने तुमचा पत्ता निफाडचा झाला आहे तो सुधारावा लागेल, असे सांगून साहेबांची स्वाक्षरी आणण्यास सांगितले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्याकडे जाऊन दोनवेळा पैसे भरल्याचे सांगताच त्यांनी हातातील कागद हिसकावून आम्हाला तेच काम आहे का असे सांगून कार्यालयातून हात धरून बाहेर काढले. (वार्ताहर)