आॅनलाइनद्वारे महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:04 AM2018-10-07T01:04:14+5:302018-10-07T01:04:29+5:30
दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्वत:चा व्यवसाय असावा व आपल्या पतीच्या व्यवसायात हातभार लागावा या उद्देशाने आरती विसपुते यांनी बँकमित्र या वेबसाइटवरील आॅनलाइन ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केला होता. संशयिताने अमित कुमार असे नाव सांगून बँक मित्र कंपनीचा टेलिमार्केटिंगमध्ये काम करत असल्याचे भासवून नोंदणी फी म्हणून बँक मित्रच्या बँक खात्यात १५ हजार ६०० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्ये ओव्हरड्राफ्ट ठेव म्हणून पन्नास हजार रुपये भरावे लागतील असे सांगून पन्नास हजार रुपये बँक मित्र कंपनीच्या नावावर भरण्यास भाग पाडले.
परत सदर इसमाने फोन करून स्थानिक गावाच्या लोकसंख्येचा विचार करता तुमची रक्कम कमी पडत असून परत पंचवीस हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फोन करून सांगितले की, तुमचे दीड लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा झाले असा मोबाइलवर संदेश पाठविला. त्यानंतर कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या उपकरणांचे डिपॉझिट म्हणून ६५ हजार रुपये भरणा केले गेले. याच सबबीखाली परत ५९ हजार रुपये भरणा केले. आठ दिवसानंतर पुन्हा अमित कुमार याने फोन करून सांगितले. रिझर्व्ह बँक व कंपनीच्या तीन व्यक्ती दिंडोरी येथे येणार असून, त्यांचा राहण्याच्या व खाण्याच्या खर्चापोटी ४५ हजार रुपये द्यावे लागतील. ही रक्कम पण त्याच्या बँक खात्यामध्ये भरली. पैशाच्या सततच्या मागणीमुळे विसपुते यांना संशय आला.
अमित कुमार याच्याशी फोनवर संपर्क साधून सर्व रक्कम परत करण्याची मागणी केली तेव्हा त्याने रक्कम परत हवी असल्यास परतावा रक्कम ५२हजार ५२० रुपये आमच्या खात्यामध्ये भरावे लागतील अशी मागणी केली. त्यामुळे विसपुते यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून बँक मित्र या कंपनीची सखोल चौकशी करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितास कडक शासन करण्याची मागणी विसपुते यांनी केली आहे.