आडगावात महिलेची सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:06+5:302020-12-26T04:12:06+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथून आडगाव शिवारातील टाकळी रोडवरील एका लॉन्समधील विवाह सोहळ्यासाठी आलेली महिला लॉन्स बाहेर उभी ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथून आडगाव शिवारातील टाकळी रोडवरील एका लॉन्समधील विवाह सोहळ्यासाठी आलेली महिला लॉन्स बाहेर उभी असताना ही घटना घडली. सोनसाखळी चोरीबाबत नवी मुंबईतील साईनगर सोसायटीत राहणाऱ्या राखी आतिष वाघ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या नाशिकला नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला आलेल्या होत्या. रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास त्या लॉन्स बाहेर उभ्या असताना काळया रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सव्वालाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने ओरबाडून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दोघा सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्फो बॉक्स
नाकाबंदी नावालाच का?
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून देण्याचा धडाका लावला आहे. मात्र पोलीस प्रशासनाला सोनसाखळी चोरांचा छडा लावण्यास अपयश येत आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत रोज नाकाबंदी केली जात असताना नाकाबंदीतून चोरटे सहज प्रसार होत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांची नाकेबंदी केवळ दिखाव्यापुरतीच आहे का असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.