बसमधून महिलेचे मंगळसूत्र लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:52+5:302021-04-02T04:14:52+5:30
रुग्णांच्या नातेवाईकांना चिंता नाशिक : शहरातील कोरोना बाधित रुग्णांना रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झालेली ...
रुग्णांच्या नातेवाईकांना चिंता
नाशिक : शहरातील कोरोना बाधित रुग्णांना रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरकारी रुग्णालयामंध्ये उपचारासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, तेथेही बेड फल्ल असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता पसरलेली दिसते.
टाकळीकडे जाणाऱ्या मार्गावर दुर्गंधी
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स चौकातून टाकळीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मलवाहिनीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून या नाल्याची स्वच्छाता नियमित करण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे.
सायबर कॅफेमधील गर्दी रोखावी
नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध शासकीय अर्ज दाखल करणे तसेच प्रमाणपत्रे, नोंदणीसाठी सायबर कॅफेतच नागरिकांना जावे लागते. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच सायबर कॅफेवर गर्दी होत असल्याने येथील गर्दीवर आळा घालण्यासाठी नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडूनच केली जात आहे.
लहान मुलांच्या काळजीकडे दुर्लक्ष
नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना उपनगर परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुले घोळक्याने खेळत असल्याचे दररोज सायंकाळी दिसून येते. यंदा लहान मुलांनाही कोरोनाचा धोका असल्याचे तज्ञ्ज सांगत असतांना लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या दिवसात लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
कॉलेज रोडवर खवय्यांची गर्दी कायम
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढलेला दिसत असतानाही कॉलेज रोडवरील खाद्य स्टॉल्स आणि पावभाजी सेंटर्समध्ये खवय्यांची गर्दी झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी काही दुकानदार ग्राहकांना मागच्या दाराने आतमध्ये बसून त्यांची ऑर्डर पूर्ण करीत असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: पावभाजी, चायनिज, बर्गर, सॅन्डविच अशा स्नॅक्स विक्रेत्यांकडून निर्बंधाचा भंग केला जात आहे.
रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
नाशिक : कोरोनाचा धोका वाढलेला असतानाही शहरातील काही मार्गांवर रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षात जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक केल्यामुळे संसर्गाचा धोका इतरांनाही होण्याची शक्यता आहे. चालकाला देखील धोका असल्याने चालकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात सर्वत्र ‘माझी जबाबदारी’ पोस्टर्स
नाशिक : नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने ‘माझी जबाबदारी’अशा आशयाचे पोस्टर्स सर्वत्र लागले आहेत. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा आणि हात नियमित स्वच्छ ठेवा अशी त्रिसूत्री सांगणाऱ्या या माहिती फलकातून जनजागृती करण्यात आलेली आहे. आकर्षक असलेले हे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.