सातबारा उताऱ्यावर आता महिलांची नोंदं
By admin | Published: August 6, 2016 12:05 AM2016-08-06T00:05:28+5:302016-08-06T00:05:38+5:30
कळवण : महिला सक्षमीकरण अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार
कळवण : शासनाच्या महसूल विभागामार्फत सप्ताहात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. यंदा हे अभियान महिला सक्षमीकरण अभियान म्हणून राबविण्यात येणार असून, या कालावधीत महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने कळवण तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.
कळवण तलाठी कार्यालयात महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेतील महिला लाभार्थींना धनादेश देऊन करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष रंजना पगार, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी महाले, नगरसेवक भाग्यश्री पगार, रंजना जगताप, अनिता जैन, अनिता महाजन, अनुराधा पगार आदिंसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महसूलदिनी कळवण तलाठी कार्यालयात नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्या हस्ते महिला सक्षमीकरण अभियानाचे उद्घाटन करण्यात येऊन महिला सप्ताहाचा उद्देश, महिला खातेदारांना त्यांच्या नावाचे ७/१२ चे नि:शुल्क वितरण तसेच महिलांच्या तयार वैयक्तिक लाभाचे वितरण, महिलांना दैनंदिन येणाऱ्या समस्यांसंदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.
कळवणच्या उपनगराध्यक्ष रंजना पगार यांना त्यांच्या नावाने असलेला ७/१२ उतारा नि:शुल्क तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते यावेळी देण्यात आला. तसेच सातबारावर पुरु षांसोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी अभियानसंदर्भात माहिती देताना सांगितले की, शासनाकडून प्राप्त निर्देशांनुसार १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महाराजस्व अभियानात तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्र म राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत गावपातळीवर महिला खातेदारांसाठी मेळावे आयोजित करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विविध उपक्र म हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी चावडे यांनी सांगितले.
शासनाच्या सहकार, कृषी, महिला व बालकल्याण यांच्यामार्फत महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती महिलांना देणे आणि त्यांचा या योजनांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सातबारा उताऱ्यावर पुरु षांसोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करणे, वारस नोंदी करताना महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास नव्याने वारस नोंदवून महिलांचा समावेश करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांधण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्र ारी प्राधान्याने कार्यवाही करणे, महिला खातेदारांच्या ‘अधिकार अभिलेख’ विषयी प्राधान्याने कारवाई करणे, महिला जॉबकार्डधारकांना मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापित्रकेवर कुटुंबप्रमुख म्हणून महिलांची नोंद करणे, मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या व १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची नावे नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, शाळा-महाविद्यालयांत मुलींना दाखले वितरण करणे, आधारवड योजनेअंतर्गत महिला लाभार्थींना (विधवा, अपंग, वृद्ध) अधिक समावेशासाठी विशेष मोहीम राबविणे, आधार नोंदणीकरिता महिलांसाठी विशेष मोहीम राबविणे असे उपक्र म राबविण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.
(वार्ताहर)