मांजरगावच्या दारू दुकानाला महिलांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:46 PM2020-05-12T22:46:53+5:302020-05-12T23:29:47+5:30
नाशिक : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथील देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ते उघडण्याचा दुकान मालकाचा प्रयत्न तेथील महिलांनी हाणून पाडला असून, या संदर्भात शासन दरबारी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत दारू दुकानाला टाळे ठोकले आहे.

नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथे जय मल्हार हॉटेलला देशी दारू विक्रीचा परवाना असला तरी दुकान मालकाने ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने हे दुकान सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशा आशयाचे निवेदन मांजरगावचे सरपंच पंडित आनंदा सोनवणे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी, निफाड तालुक्याचे आमदार दिलीपकाका बनकर, सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच तहसीलदार यांना पाठविले होते. गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत तसा ठराव करून शासन दरबारी पाठपुरावाही केला होता. नांदूरमधमेश्वर अभयारण्य असून, या ठिकाणी पर्यटक येतात. या पर्यटकांकडून दारूचे सेवन होऊन अभयारण्याला बाधा पोहचू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असतानाही शासनाने मद्यविक्रीवरील निर्बंध उठविताच, पुन्हा दुकान मालकाने दुकान सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याची बाब गावातील महिलांना कळताच, त्यांनी दारू दुकानाला टाळे ठाकले. सदर दुकान कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सरपंच पंडित सोनवणे, उपसरपंच मंदा बारकू दौंड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी दिला आहे.