महिला बीट मार्शल रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:51 AM2019-07-01T00:51:04+5:302019-07-01T00:51:20+5:30
मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाणे अंतर्गत महिला बीट मार्शल रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. प्रत्येकी दोन दुचाकींवरून दोन महिला पोलीस परिसरात गस्त घालणार आहेत.
इंदिरानगर : मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाणे अंतर्गत महिला बीट मार्शल रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. प्रत्येकी दोन दुचाकींवरून दोन महिला पोलीस परिसरात गस्त घालणार आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा घालण्यास पोलिसांना यश आलेले नाही. सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील एकाही संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नाही. पोलीस गस्त थंडावल्याने चोरट्यांचे फावल्याचे बोलले जात होते. वाढत्या गुन्हेगारीनंतर इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली. या पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी हवा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिला बीट मार्शलच्या गस्तीमुळे शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींच्या होणाºया छेडछाडीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे.
महिला बीट मार्शल कर्मचारी इंदिरानगर, राजीवनगर, वडाळा-पाथर्डी रस्ता, आनंदनगर, चेतनानगर, किशोरनगर, रामनगर, राणेनगर, पाथर्डी फाटा, ज्ञानेश्वरनगरसह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर गस्त घालणार आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी चंदन वृक्ष, मोबाइल लंपास केल्याची घटना घडली आहे. नामदेव बाबाराव पवार (३५, रा. दत्तनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने गरवारे हाउस येथून बुधवारी (दि.२६) मध्यरात्री दोन चंदनाचे वृक्ष कापले व ५ फूट लाकूड लंपास केले. तसेच सुरक्षारक्षकाच्या खोलीची काच फोडून नुकसान केले.
मोबाइल चोरीच्या घटनाही याठिकाणी घडल्या आहेत. अशा विविध गुन्हेगारी घटनांचे आव्हान इंदिरानगर पोलिसांपुढे राहणार आहे.