कोरोना लसीकरणात महिला पुरुषांच्या तुलनेत निम्मे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:06+5:302021-06-11T04:11:06+5:30

नाशिक : कोरोना लसीकरणात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या लसीकरणाच्या तुलनेत निम्मेच आढळले आहे. मुळात प्रारंभापासून महिलांच्या लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजांमुळे महिला ...

Women half as much as men in corona vaccination! | कोरोना लसीकरणात महिला पुरुषांच्या तुलनेत निम्मे !

कोरोना लसीकरणात महिला पुरुषांच्या तुलनेत निम्मे !

Next

नाशिक : कोरोना लसीकरणात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या लसीकरणाच्या तुलनेत निम्मेच आढळले आहे. मुळात प्रारंभापासून महिलांच्या लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजांमुळे महिला वर्ग बराचसा साशंक होता. तसेच लसीकरणासाठीच्या रांगा, अनुपलब्धता तसेच गर्भवती, स्तनदा माता, मासिक पाळीदरम्यान लसीकरणाबाबत असलेली प्रारंभीच्या टप्प्यातील संदिग्धता अशा विविध बाबींमुळे महिला वर्गाचे लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत निम्मेच राहिले आहे.

देशात प्रारंभी ६०वरील त्यानंतर ४५वरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. मात्र, १८ वर्षांवरील गटात समावेश असलेल्या गर्भवती व बाळंतीण महिलांना लस देण्याविषयी कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नव्हत्या. त्यामुळे या गटातील देशातील कोट्यवधी महिलांचे लसीकरण प्रलंबित राहिले आहे. दुसरीकडे, विदेशातील लाखापेक्षा जास्त गर्भवती आणि स्तनदा मातांनी लसी घेतल्या आहेत आणि कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे या गटातील महिलांनी लस जरूर घ्यावी, अशी भूमिका स्त्रीरोगतज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली आहे. लसींच्या विशिष्ट गटातील महिलांवर चाचण्याच झाल्या नाहीत, म्हणून त्यांचे लसीकरण करू नये, असादेखील मतप्रवाह प्रारंभी नव्हता, तर आतापर्यंत झालेल्या चाचण्या, संभाव्य धोका व इतर बाबींची पुरेशी माहिती देऊन लस घेण्याचा निर्णय या गटातील महिलांवर सोपवावा, असेही संघटनांनी म्हटले आहे. या सर्व बाबींचा परिणाम महिलांच्या लसीकरणावर झाला असून, जिल्ह्यातील पुरुषांच्या तुलनेत निम्म्याच लसी महिलांनी घेतल्या आहेत.

कोणतेही प्रतिकूल परिणाम नाही

लसीकरणामुळे जनुकीय बदल झाल्याचे किंवा गर्भावर किंवा बाळंतपणावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आतापर्यंत तरी समोर आलेले नाही, तर दुसरीकडे मासिक पाळीमध्ये लस न घेण्याविषयीचा गैरसमज समाजमाध्यमांतील काही संदेशांमधून पसरवला गेल्याचा परिणामदेखील महिलांच्या लसीकरणावर झाला.

मी लस घेतली नाही कारण

माझे बाळ अजून अवघे चार महिन्यांचे आहे. त्यामुळे मी लस घेतल्याने त्याचा कोणताही परिणाम बाळावर होऊ नये. हा त्यामागील विचार असून, त्यामुळेच मी अद्याप लस घेतलेली नाही.

वैशाली जाधव, गृहिणी

मी प्रेग्नंट असून, या काळात लस घेतल्यास त्याचा काही परिणाम माझ्या बाळावर होऊ नये, यासाठी मी लस घेतलेली नाही. डॉक्टरांनी लस घेण्यास काही समस्या नसल्याचे सांगितले असले तरी मला काळजी वाटते.

गीता शेवाळे, गृहिणी

कोट

तीन महिन्यांपुढील गर्भवती व बाळंत महिलांनी लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजे. तसेच मासिक पाळीचा व लसीकरणाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातही लस घ्यायला हरकत नाही, हे लक्षात घेऊन समस्त गैरसमजांकडे दुर्लक्ष करून लस अवश्य घ्यावी.

डॉ. निवेदिता पवार, प्रसूती तज्ज्ञ

Web Title: Women half as much as men in corona vaccination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.