महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:07 IST2020-02-22T19:03:16+5:302020-02-22T19:07:40+5:30
शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे

महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’
नाशिक : जाती-धर्माच्या भिंती उभारून नागरिकांमध्ये भेदाभेद निर्माण करणारा आणि भारतीय संविधानविरोधी असलेला सीएए कायदा तसेच एनआरसी, एनपीआर या मोहिमा केंद्र सरकारने तत्काळ रद्द कराव्या, या मागणीसाठी दिल्लीच्या ‘शाहीनबाग’च्या धर्तीवर शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर शनिवारी (दि.२२) सकाळपासून महिलांनी ‘संविधान के सन्मान में, हम निकले मैदान में...,’ असे म्हणत एकत्रित येत ‘सादिक बाग’ आंदोलन पुकारले. या आंदोलनात शेकडो बुरखाधारी महिलांनी सहभागी होत सीएए कायद्याविरोधी तीव्र संताप व्यक्त करत निषेधार्थ दिवसभर घोषणाबाजी केली.
शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली.
हे आंदोलन संध्याकाळी ६ वाजता तात्पुरत्या स्वरूपात संपले. रविवारी पुन्हा (दि.२३) सकाळी १० वाजेपासून संध्याकाळपर्यंत महिलांच्या ठिय्या आंदोलनाला प्रारंभ होणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विचारमंचावरून आलेमा सादेका नुरी, आलेमा सायमा बाजी, निलोफर बाजी, निगारमदिना बाजी, परवीन बाजी, जुलेखा बाजी यांनी उपस्थित महिलांना सीएए,एनआरसीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी महिला पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी पुरविण्यात आला होता.