साहित्य मेळाव्यात महिला दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:40 AM2019-03-10T00:40:21+5:302019-03-10T00:40:55+5:30
साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.
एकलहरे : साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.
शारदा बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित महिला साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा पाटील बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा शारदा गायकवाड, स्वागताध्यक्ष विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, किशोर पाठक, विद्या फडके, सुनीता मुरकेवार, भीमराव कोते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनंदा पाटील म्हणाल्या की, अपत्य जन्म व संसारात गुरफटलेल्या स्त्रियांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना व्यक्त होताना संकोचाचा पडदा असतो. त्यामुळे स्त्रियांची लेखणी थांबते. लोकगीतातून स्त्रिया दु:ख, भावना व्यक्त करतात. त्या बोलल्या नाहीत तर त्यांच्या व्यथा समजणारच नाहीत. परंतु, आता स्त्री मोकळी होत आहे. आवड असेल तर सवड मिळते. स्त्रियांनी कथा, कविता, कादंबऱ्या, लेख लिहावेत. स्त्रियांनी घरातील विरोध मोडून आपली ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त केल्यास साहित्यात चांगली भर पडेल. स्त्रियांनी घराच्या मर्यादा ओलांडू नये, परंतु मागेही राहू नये. ज्या गोष्टी मानसिकतेत आहेत तेथे लेखणी चालवावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले यांनीही मार्गदर्शन केले. शारदा गायकवाड यांनी प्रास्ताविक तर अंजना भंडारी व सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन अलका कोठावदे यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या संमेलनात गीतमैफल, कविता संमेलन व अन्य कार्यक्रम झाले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच अर्पणा क्षेमकल्याणी, माया दामोदर (शेगाव), सुवर्णा जाधव (मुंबई), सपना नेर, शैलजा करोडे (पुणे), रचना (नगर) यांना यमुनाई पुरस्काराने गौरविण्यात आले. रघुनाथ कोठावदे, रजनी बारसे, अलका कोठावदे, जालिंदर गायकवाड, जयश्री जांभळे, नंदकिशोर ठोंबरे, राजेंद्र चिंतावार, दत्ता दाणी आदींंसह महिला साहित्यिक उपस्थित होते.