शहराच्या रस्त्यांवर महिला असुरक्षित; दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:23 PM2020-10-08T19:23:12+5:302020-10-08T19:27:24+5:30
चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.
नाशिक : शहर व परिसरात दररोज सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिसांच्या हाती मात्र अद्याप एकही चोरटा लागलेला नाही, हे विशेष! मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा मायकोसर्कलजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार झाले.
फिर्यादी भारती सिताराम जाधव (३०, रा.कमलनगर, कामटवाडे) या बुधवारी (दि.७) काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रात्री दहा वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरी परतत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे जाधव या पायी जात नव्हत्या तर त्र्यंबकरोडने त्यांच्या ज्युपीटर या मोपेड दुचाकीने (एम.एच २१ बी ८९९९ ) घरी मार्गस्थ होत होत्या. तरीदेखील चोरट्याने त्य्एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पलायन केले. यावेळी जाधव यांच्या शरिराला हिसका बसला; मात्र सुदैवाने त्यांनी दुचाकीसह तोल संभाळल्याने कोसळल्या नाही, अन्यथा गंभीर दुखापत झाली असती. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोराविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलांना रस्त्यांवरुन पायी तर सोडाच मात्र दुचाकीनेसुध्दा मार्गस्थ होणे आता सुरक्षित राहिले नसल्याचे या घटनेवरुन दिसून येते. चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.
महिला भयभीत; पोलीस अपयशी
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सोनसाखळ्या चोरटे हिसकावून पोलिसांना आव्हान देत आहेत; मात्र पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांसह शहर गुन्हे शाखा युनीट-१ व २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेलासुध्दा या सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकण्यास अपयश येत असल्याने महिलावर्गांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनसाखळी खेचून पलायन केल्याचा दररोज एक तरी गुन्हा शहरातील तेरापैकी एका पोलीस ठाण्यात काही दिवसांपासून दाखल होत आहे.