७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांनी सक्षम होणे गरजेचे माधवी नाईक : भाजपाचा महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:55 AM2018-01-07T00:55:46+5:302018-01-07T00:56:21+5:30
नाशिक : भारतीय राज्यघटनेतील ७३, ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळाली हे जरी खरे असले तरी महिलांनी वैयक्तिक पातळीवर सक्षम होणे गरजेचे आहे.
नाशिक : भारतीय राज्यघटनेतील ७३, ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळाली हे जरी खरे असले तरी महिलांनी वैयक्तिक पातळीवर सक्षम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी केले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. शनिवारी (दि.६) त्र्यंबकरोडवरील सौभाग्य मंगल कार्यालय येथे सायंकाळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नाईक पुढे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारी खुली केली म्हणून आज आपण इथे आहोत. त्यांची स्मृती ठेवत ज्या पदावर आज तुम्ही आहात (नगरसेवक, खासदार, आमदार) त्या पदाला न्याय द्या. राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्या. तरच तुम्ही लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकाल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वाती जाधव, रोहिणी नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे औचित्य साधून शहरातील महिला भाजप कार्यकर्त्यांची नेत्र व रक्त तपासणी करण्यात आली. याप्रसंगी अलका अहेर, संध्या कुलकर्णी, मोहिनी भगरे, स्मिता बोडके, सोनल दगडे, सुजाता करजगीकर, भारती बागुल आदींसह भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला पत्रकारांचा सत्कार
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मेळाव्यात ‘लोकमत’च्या उपसंपादक भाग्यश्री मुळे, सकाळच्या हर्षदा देशपांडे व टाइम्स आॅफ इंडियाच्या सुमिता सरकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाईक यांच्या उपस्थितीत सकाळी नाशिकरोड, सिडको, कॉलेजरोड, गंगापूररोड, सातपूर आदी ठिकाणी महिला शाखांचे उद्घाटन करण्यात आले.