महिला पोलीसने रस्त्यावरच रिक्षाचालकाला चोप
By admin | Published: May 30, 2015 01:44 AM2015-05-30T01:44:01+5:302015-05-30T01:44:23+5:30
महिला पोलीसने रस्त्यावरच रिक्षाचालकाला चोप
नाशिक : दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी शहरातील रिक्षाचालकांकडे अंगुलीनिर्देश करीत सभ्य वागणुकीचा सल्ला दिला होता. मात्र, रिक्षावालेच ते... ‘हम नही सुदरेंगे’ अशी भीष्मप्रतिज्ञाच घेतल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिला प्रवाशांची छेड काढण्यात तर ते पुरुषार्थच मानत असतात. अशाच एका निर्ढावलेल्या रिक्षाचालकाने एका महिला पोलिसाची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला. त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यावरच रिक्षाचालकाला चोप देत चांगलाच धडा शिकविला. सिबीएस चौकात सदर प्रकार घडला. सीबीएस चौकात दररोज डझनभर वाहतूक पोलिसांचा फौजफाटा दिवसभर तैनात असतो. या पोलिसांच्या साक्षीनेच येथील रिक्षाचालक येणाऱ्या जाणाऱ्या महिला प्रवाशांना विक्षिप्तपणे खुणावत इशारे करीत असतात. नंदुरबारहून नाशिकमधील नातेवाइकांकडे आलेल्या अशाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सीबीएस बसस्थानकावर उतरताच रिक्षाचालकाच्या विकृत प्रवृत्तीचा सामना करावा लागला. सायंकाळी साडेसहा वाजेची वेळ. केटीएचएम महाविद्यालयाकडे जाण्यासाठी त्या रिक्षा शोधत असताना भरधाव वेगात एक रिक्षा त्यांच्याकडे आली. एकटी महिला बघून त्याने विचित्रपणे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिला पोलिसाने त्याला चांगला धडा शिकवत थेट रस्त्यावरच चोप दिला. हे बघून चौकातील वाहतूक पोलीस धावतच घटनास्थळी पोहचले. त्यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले, मात्र रिक्षाचालक तेथील पोलिसांना ओळखत असल्याने आलेल्या पोलिसांशी हा पठ्या हस्तांदोलन करीत आपली ‘पोहच’ दाखवित होता. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे चार ते पाच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तेव्हाही आश्चर्यच घडले. सर्व पोलीसदादा या महाशयाचे सवंगडीच निघाले. जणू काही हे पोलीस कर्मचारी त्या रिक्षाचालकाचे वर्गमित्र असल्यासारखे एकमेकांशी संवाद साधत होते. बहुधा ही बाब इतर रिक्षाचालकांच्या लक्षात आली. त्यातील काही रिक्षाचालकांनी पोलिसांकडे तक्रार करीत ‘साहेब याला जेलमध्येच टाका, दररोज हा महिला प्रवाशांची छेड काढत असतो’, असे सांगितले. जमावाचा विरोध बघता पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यापर्यंत नेले अन् कुठलाही गुन्हा दाखल न करता तासाभरात सोडले. आपल्याच खात्यातील पोलिसांकडून रिक्षाचालकाला सहकार्य मिळत असल्याचे पाहून त्या महिला पोलीस आवाकच झाल्या. (प्रतिनिधी)