साध्या गणवेशातील महिला पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणांवर असणार लक्ष : विश्वास नांगरे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:36 PM2019-05-16T16:36:04+5:302019-05-16T16:39:26+5:30
सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती कळविली जाणार आहे.
नाशिक : भाजी बाजार, महाविद्यालय, शाळांचा परिसर, रूग्णालयांच्या आवार, बसस्थानके, मॉल परिसरासारख्या गर्दीच्या ठिकाणी महिला, युवतींची असलेली गर्दी लक्षात घेता त्यांची छेड काढण्याचे प्रकार वाढत आहेत. मागील काही महिन्यांत विनयभंगाच्या तक्रारीही शहर व परिसरात वाढल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर आता साध्या वेशातील महिला पोलिसांची ‘नजर’ राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयात गुरूवारी (दि.१६) सिनिअर जर्नलिस्ट फोरमची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपआयुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, माधुरी कांगणे यांच्यासह फोरमचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नांगरे पाटील यांनी शहरातील कायदासुव्यवस्थेविषयी आढावा घेत उपस्थितांसोबत चर्चा केली. शहरात पोलिसांकडून सुरू असलेली हेल्मेट, सीटबेल्टसक्ती तपासणी मोहीम, घरफोडी, सोनसाखळी चोरी, लूटमार, वाहनचोरी आदि घटनांविषयी चर्चा करण्यात आली. शहरात होणाऱ्या रस्ते अपघातात मेंदूला जबर मार लागून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने सीटबेल्ट सक्तीची तपासणीवर लक्ष दिले जात असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती कळविली जाणार आहे. जेणेकरून गुन्हेगारांसह, रोडरोमीयोंनाही चाप बसण्यास मदत होईल.