महिला बचत गटांनी तयार केले ५० हजार मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:46 PM2020-03-29T16:46:38+5:302020-03-29T16:50:24+5:30
नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात येऊन उद्योगधंदे, रोजगार निर्मिती बंद झालेली असताना नाशिक जिल्हा परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या मास्कचा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या आठ दिवसांत महिला बचत गटांनी ५० हजार मास्कची निर्मिती करण्याबरोबरच घरच्या घरी रोजगार निर्मितीला हातभार लावला आहे.
नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही बाधित झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना विविध उपाययोजना सुचविण्यात येत असताना त्यात प्रत्येकाला मास्क वापरण्याची सूचना करण्यात आलेली आहे. परंतु रुग्णालये, औषधी दुकानांमध्ये मास्कचा तुटवडा भासत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागातील महिला बचत गटांनाच त्यासाठ प्रोत्साहित केले आहे. मास्कची निर्मिती करून ती प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना वितरीत करून नागरिकांमध्ये मास्कची उपयोगीता व बचत गटांना रोजगाराची सोय त्यामुळे निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांत ३२ गटांच्या माध्यमातून सुमारे ५० हजारांहून अधिक कापडी मास्क तयार करण्यात आले असून, त्यातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गरज भागविली जात आहे. मास्कला असलेली मागणी पाहता गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बचत गटांशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.
चौकट===
आशा, अंगणवाडी सेविकांकडून जनजागृती
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच ग्रामीण भागात जनजागृतीसाठी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले जात असून, त्यात प्रामुख्याने हात स्वच्छ धुणे, गर्दीपासून दूर राहणे आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनीदेखील याकामी पुढाकार घेतला असून, आठवडे बाजाराऐवजी दररोज गावातील एका व्यक्तीला भाजीपाला विक्रीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी