स्त्रियांनी स्वत:ची शक्ती ओळखावी : दीपाली सय्यद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:26 AM2019-04-01T01:26:36+5:302019-04-01T01:27:10+5:30
नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते.
नाशिक : नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते. स्त्रीने आपल्याती शक्ती ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केले.
प. सा. नाट्यमंदिर येथे अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अस्तित्व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सय्यद बोलत होत्या. व्यासपीठावर सीताबाई मोहिते, रोहिणी वाघ, विमल पटेल, संगीता सोनवणे, सुनंदा पटवर्धन, विजया मानमोडे उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मान असतो. या आत्मसन्मानाचे रक्षण कुटुंब आणि समाजानेही करणे अपेक्षित आहे स्त्रीच्या कामाचे कौतुक झाले आणि तिला प्रोत्साहन मिळाले तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात आपली प्रतिमा निर्माण करू शकते. तिला संधीची गरज आहे, असे म्हणाल्या. प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा कोठावदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनाली म्हरसाळे यांनी केले.
यांचा झाला सत्कार
दीपाली सय्यद यांच्या हस्ते डॉ. मेघा ताडपत्रीकर (पुणे), सीताबाई मोहिते (जालना), आदिवासींसाठी लढा देणाऱ्या डॉ. प्रतिभा शिंदे (धुळे), प्रमिला कोकड (जव्हार), संपदा हिरे, रोहिणी वाघ, शरीरसौष्ठवपटू स्नेहल कोकणे, धावपटू नलिनी कड, कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या नलिनी कड ( मुंबई), सुनंदा पटवर्धन (जव्हार), सुवर्णा कटारिया (सोलापूर), विजया मानमोडे (पुणे), सपना पारख (नाशिक), मेघा ताडपत्रीकर (पुणे), वीरमाता सुषमा मांडवगणे, रोहिणी वाघ, स्नेहा पाटील (नाशिक), प्रीती आगाज, एकादशी लोंढे (सांगली), प्रिती चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.