समाजातील महिलाही ब्यूटी सलोन झाल्या सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:01 AM2019-06-26T01:01:39+5:302019-06-26T01:02:05+5:30
केशकर्तनच्या पारंपरिक व्यवसायाने आता कात टाकली असतानाच समाजातील महिलाही मागे नाहीत. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आता युवती आणि महिलाही ब्यूटी सलून किंवा ब्यूटी पार्लरच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या असून, काही पती-पत्नीने एकत्रितरीत्या फॅमिली सलूनदेखील सुरू केले आहे.
सलून व्यवसायातील स्थित्यंतरे
नाशिक : केशकर्तनच्या पारंपरिक व्यवसायाने आता कात टाकली असतानाच समाजातील महिलाही मागे नाहीत. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आता युवती आणि महिलाही ब्यूटी सलून किंवा ब्यूटी पार्लरच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या असून, काही पती-पत्नीने एकत्रितरीत्या फॅमिली सलूनदेखील सुरू केले आहे.
नाभिक समाजात केशकर्तनचा पारंपरिक व्यवसाय. त्यात सहसा महिला सहभागी नसत. घरातील कर्त्या पुरुषाचा व्यवसाय असेल तर कुटुंबातील मुलगाच त्यात सहभागी होत.
शिक्षणापेक्षा घरातील व्यवसायावर भर दिला जात असल्याने रोजगार मिळाला, परंतु शिक्षण राहिले अशी अवस्था होती. त्यातच आता युवा पिढीला नवनवीन करिअरचे पर्याय उपलब्ध झाल्याने अत्यंत कष्टप्रद तसेच जोखमीच्या व्यवसायात युवा पिढी उभी राहण्यास तयार नसे. परंतु गेल्या काही वर्षांत या व्यवसायाचे स्वरूप बदलले असून, केवळ सलूनच नव्हे तर सौंदर्यवृद्धीवर भर देणारा व्यवसाय ठरला. यात कार्पोरेट कंपन्या उतरल्या. त्यामुळे युवा पिढी पुन्हा या पिढीजात व्यवसायाकडे वळलीच. परंतु समाजातील युवती आणि महिलाही चांगल्याच सरसावल्या आहेत.
ब्यूटी सलूनच्या या व्यवसायात पुरुषांप्रमाणेच महिलादेखील सहभागी झाल्या आहेत. त्यात अन्य समाजातील तसेच उच्चभ्रू महिलादेखील ब्यूटी पार्लर, स्पा यांसारखे व्यवसाय अत्यंत नेटाने चालवित आहेत. त्यामुळे ज्यांचा या व्यवसायाशी संबंध नाही अशा महिला या व्यवसायात उतरून या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देत असतील तर समाजातील महिलांनी मागे का राहावे याच उद्देशाने समाजातील महिलादेखील घराबाहेर पडल्या आहेत. अर्थातच कुटुंबाच्या पाठबळाने. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे चांगल्या ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षण घेतानाच अनेक युवतींनी स्पा आणि तत्सम सेवांचे खास प्रशिक्षण घेतले.
महिलांमुळे कुटुंब सक्षम होण्यास मदत
सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्यांकडून पुढाकार घेऊन महिलांना खास प्रशिक्षण देत असल्याने या महिला किंवा युवती स्वत:चा व्यवसाय सुरू करतात किंवा चांगल्या मोठ्या कार्पोरेट सलून किंवा स्पामध्येदेखील नोकरी पत्करतात. शहरातील काही व्यवसायिकांनी घरातील महिलांच्या मदतीने फॅमिली सलूनदेखील सुरू केले आहे. एकाच कुटुंबातील पुरुष आणि महिला दोघेही यात जाऊ शकतात. समाजातील महिलांचा व्यवसायात पुढाकार हे फार मोठे पाऊल मानले जात आहे. अशा महिलांमुळे कुटुंबदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदतच झाली आहे.
शासनाच्या आयटीआय-मधून सन २००२ मध्ये ब्यूटी पार्लरचा कोर्स केला. लग्नानंतर पुन्हा या सरावासाठी क्लास लावून उजळणी करून घेतली व सध्या माझे स्वत:चे ब्यूटी पार्लर आहे. गेल्या १४ वर्षांपासून ब्युटीशियन म्हणून काम करीत असून, या संदर्भातील ब्यूटी सेमिनारला भेटी देऊन नवनवीन हेअर कट, मेकअपचे प्रकार शिकता आले आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणून कुटुंबाला हातभार व नवनवीन शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
- सविता संदीप डाके, व्यावसायिक