दळवट येथे दारूबंदीसाठी महिलांनी घेतला पुढाकार

By Admin | Published: July 3, 2014 10:10 PM2014-07-03T22:10:06+5:302014-07-04T00:15:59+5:30

दळवट येथे दारूबंदीसाठी महिलांनी घेतला पुढाकार

Women took initiative for drunkenness at Dalwood | दळवट येथे दारूबंदीसाठी महिलांनी घेतला पुढाकार

दळवट येथे दारूबंदीसाठी महिलांनी घेतला पुढाकार

googlenewsNext

 

मनोज देवरे

कळवण
दारूचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समोर आल्याने दळवट येथील महिलांनी दारूबंदीचा निर्धार केला असून, गावकऱ्यांच्या पाठिंब्याने दारू खरेदी-विक्री करणाऱ्यांना आर्थिक दंडही ठोठावला जाणार आहे.
अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत खेडोपाडी किराणा दुकानातून देशी-विदेशी दारू सर्रास विकली जात असून, आदिवासी पाड्यांवर ती उपलब्ध होत असल्याने लहान लहान मुले दारूच्या आहारी गेले आहेत. आदिवासी महिलांचे संसार उघड्यावर पडले असून, दळवट व विरशेत भागात, तर दारूमुळे मुलांची काम करण्याची इच्छाशक्ती मरण पावली आहे. त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असून, आदिवासी मुलांचे शरीर सुजून उठले आहे . याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष झाल्याने दळवट येथील आदिवासी महिलांचे दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या असून, त्यांना ग्रामस्थांनी साथ दिल्याने हे शक्य झाले आहे.
वेळोवेळी निवेदन, तक्रारी करूनदेखील उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर आदिवासी महिलांनी दारूबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पुढाकार घेतल्याने दळवटमध्ये दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड आकारला जाणार आहे. या निर्णयाचे आदिवासी भागात स्वागत केले जात असून, दारूबंदीबाबत दळवट गावाने आदर्श निर्माण केल्याने तालुक्यातील आदिवासी गावामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जयश्री पवार यांना आदिवासी महिलांनी अवैध दारू बंद करण्याबद्दल निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी अभोणा पोलिसांना खेड्यावर विकली जाणारी अवैध दारू तत्काळ बंद करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावेळी काहीकाळ दारू विक्री बंद झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अभोणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अप्रत्यक्षपणे अभय देण्याचा प्रयत्न केला, दारू व्यावसायिकांबरोबर वीरशेत परिसरात पार्ट्या झोडून जणू त्यांना परवानगीचे फर्मान सोडल्याने आदिवासी भागात पुन्हा दारू विक्रीने डोके वर काढले आहे.
कित्येक दिवसांपासून आदिवासी भागात दारूबंदी व्हावी, अशी सातत्याची मागणी आहे. आदिवासी भागातील आदिवासी नेते, कार्यकर्ते हेदेखील प्रयत्नशील होते. मात्र त्यांना दारूबंदी करण्यास अपयश येत होते. दळवट येथील मंदिर परिसरात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महिलांनी गावात दारूबंदी करण्याची एकमुखी मागणी केली. दळवटचे ज्येष्ठ नेते नारायण पवार, पांडुरंग कनोज, सरपंच धनराज पवार, दौलत भोये, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद पवार, यशवंत पवार, श्यामराव भोये, लक्ष्मण पवार, दीपक बिरारी, रमेश पवार, नामदेव महाले यांनी चर्चेत भाग घेऊन महिलांच्या मागणीची दखल घेऊन दळवट गावात दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दळवट गावात मद्यपी आढळल्यास ११ हजार रुपयांचा दंड आकाराला जाणार असून, मद्यनिर्मिती (गावठी दारू) व विक्री करणाऱ्यांवरही निर्बंध कारवाई केली जाणार आहे.
दळवट, जयदर, कनाशी, विरशेत यासह आदिवासी गाव, पाड्यांवर गावठी व देशीदारू सेवन करणाऱ्या मद्यपीची संख्या लक्षणीय वाढली असून, यात युवकांची संख्या अधिक आहे. युवकांमध्ये नैराश्य पसरले असून, मद्य सेवन केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, कुटुंब उद््ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे फायदा आणि तोटा काय हे आदिवासी बांधव व महिलांच्या लक्षात आल्याने दळवट गावाने एकत्र येवून विशेष ग्रामसभा घेवून संपूर्ण गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे तालुक्यात स्वागत केले जात आहे.

Web Title: Women took initiative for drunkenness at Dalwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.