पाण्याच्या शुद्धतेवर ठेवतील गावातील महिला नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:13+5:302021-01-23T04:15:13+5:30
सध्या सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. ...
सध्या सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५ महिलांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या सूचनेवरून १५ तालुक्यांतील १,९३२ गावांतील प्रत्येकी ५ महिलांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक खासगी स्रोत यांची माहिती देण्यात आली, तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची निगा कशी राखावी, पाणी गुणवत्ताविषयक तपासणी, फिल्ड टेस्ट किटचा वापर कसा करावा, याची माहिती देण्यात आली. पाणी व स्वच्छता विभागातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्यासह जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक सुरेश जाधव व पाणी गुणवत्ता सल्लागार भाग्यश्री बैरागी, रवींद्र बाराथे यांनी उपस्थित महिलांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले. दरम्यान, गावातील ग्रामस्थांना शुद्ध आणि स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे आहे. गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी आता ग्रामस्तरावर पाण्याशी ज्यांचा अधिक संबंध येतो, त्या महिलाच निगराणी ठेवणार असल्याने, निश्चितच याचा फायदा होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.