शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना झोपविले फरशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:01+5:302021-01-22T04:15:01+5:30

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना काळात महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरू करण्यात ...

The women who underwent the surgery slept on the floor | शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना झोपविले फरशीवर

शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना झोपविले फरशीवर

Next

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना काळात महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरू करण्यात आल्या असून, तालुक्यांना ठरवून दिलले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रांवर सुमारे ४० स्तनदा मातांची एकाच वेळी बुधवारी सकाळी शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी खाटा तसेच अत्यावश्यक सेवेची कोणतीही सोय न करता, एका खोलीत जमिनीवर सर्वच शस्त्रक्रिया झालेल्या स्तनदा मातांना झोपविले. दिवसभर या महिलांकडे कोणी नंतर लक्ष दिले नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान पाच ते सात दिवस रुग्णालयातच महिलांना उपचारार्थ ठेवावे लागते हे माहिती असूनही आरोग्य विभागाने या सर्वांना वाऱ्यावर सोडले. या महिलांच्या गैरसोयीची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी हरसूल जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर व पंचायत सभापती मोतीराम दिवे यांच्याकडे करताच त्यांनी रात्री एक वाजता आरोग्य केंद्राला भेट देऊन खातरजमा केली. त्यावेळी शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वॉर्डात कुठल्याही निर्जंतुकीकरणाची सुविधा न पार पाडताच फरशीवर अंथरूण टाकून महिला रुग्णांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्या रूपांजली माळेकर, सभापती मोतीराम दिवे, विनायक माळेकर, समाधान बोडके, मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल, चंदर शेवरे, उत्तम शेवरे, वामन शेवरे, विलास शेवरे, सुभाष मौळे, उत्तम मौळे आदींनी केली आहे.

चौकट==

शस्त्रक्रिया झालेल्या स्तनदा मातांचे थंडीच्या दिवसांत जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत बघून सदस्य रूपांजली माळेकर व ग्रामस्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास आजूबाजूच्या खेड्यांतून ब्लँकेट, पिण्याचे पाणी, बिस्किटे गोळा करून या महिलांना वाटप केले..

चौकट===

क्षमतेपेक्षा अधिक शस्त्रक्रिया

शिरसगाव व ठानापाडा आरोग्य केंद्रात नसबंदी करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जीवाशी खेळण्यात आले असून, आरोग्य केंद्राच्या क्षमतेइतक्याच नसबंदी करण्यात याव्यात तसेच रुग्णांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- रूपांजली माळेकर, जि. प. सदस्य

(फोटो २१ आरोग्य ) शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जमिनीवर झोपलेल्या महिला रुग्ण

Web Title: The women who underwent the surgery slept on the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.