महिलांना मिळणार सत्तापदांचा लाभ?
By admin | Published: March 5, 2017 01:45 AM2017-03-05T01:45:44+5:302017-03-05T01:46:01+5:30
नाशिक : महापालिकेत ६६ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपात सर्वाधिक ३४ महिला उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
नाशिक : महापालिकेत ६६ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपात सर्वाधिक ३४ महिला उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तापदांचा लाभ अधिकाधिक महिला सदस्यांना देताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. शिवसेनेत ३५ पैकी १८ महिला सदस्य निवडून आल्या आहेत.
महापालिकेत भाजपा - ६६, शिवसेना - ३५, कॉँग्रेस - ६, राष्ट्रवादी - ६, मनसे - ५, अपक्ष - ३ आणि रिपाइं - १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत महिलांसाठी ६१ जागा आरक्षित होत्या. मात्र, ६२ जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधून भाजपाच्या सरोज अहिरे या अनुसूचित जाती गटातून विजयी झाल्या आहेत. ६२ जागांपैकी भाजपाच्या सर्वाधिक ३४ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेच्या १८, कॉँग्रेसच्या ३, राष्ट्रवादीच्या ३, मनसेच्या २, अपक्ष आणि रिपाइं प्रत्येकी १ महिला सदस्यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश केला आहे. भाजपाच्या एकूण ६६ जागांमध्ये ३४ महिला आणि ३२ पुरुष नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपात महिलाराज अनुभवाला येणार आहे. मात्र, सत्तापदांच्या वाटपात महिला सदस्यांना कितपत स्थान मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पहिली अडीच वर्षे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव अग्रभागी आहे. त्यामुळे महिलेला महापौरपदी स्थान मिळाल्यानंतर उपमहापौरपदी पुरुष सदस्याचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीवरही पुरुष सदस्यांकडून दावेदारी केली जात आहे.