नवरात्रीच्या नवरंगांसाठी महिलांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:19 AM2017-09-18T00:19:45+5:302017-09-18T00:19:55+5:30
नवरात्र म्हणजे बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या जागराचा उत्सव. हा उत्सव टिपºया, गरबा, उपवास, पाठ, होमहवन, महापूजा, देवदर्शन आदींद्वारे साजरा केला जातो. त्यात आता नवरात्रीचे नऊ दिवस वेळापत्रकानुसार निर्धारित रंगांच्या साड्या व ड्रेस परिधान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे.
नाशिक : नवरात्र म्हणजे बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या जागराचा उत्सव. हा उत्सव टिपºया, गरबा, उपवास, पाठ, होमहवन, महापूजा, देवदर्शन आदींद्वारे साजरा केला जातो. त्यात आता नवरात्रीचे नऊ दिवस वेळापत्रकानुसार निर्धारित रंगांच्या साड्या व ड्रेस परिधान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे.
या परंपरेमुळे एकाच वेळी अनेक हेतू साध्य होत असून, दैनंदिन रुटीनमध्ये अडकलेल्या महिलांना वेगळेपणाचा, आनंदाचा अनुभव मिळत आहे. नवरात्रात देवीला नेसवल्या जाणाºया विशिष्ट रंगांच्या साड्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे महिला साड्या व ड्रेस परिधान करत असून, यातून धार्मिक समाधानाबरोबरच काम करत असलेल्या ठिकाणी एकोप्याचे समाधान, स्त्रीशक्तीची प्रचिती करून देणे, वैविध्यपूर्ण रंग परिधान करीत मिळवलेला आत्मविश्वास अशा अनेक बाबी साध्य होत आहे. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यासाठी सध्या महिलावर्गाची लगबग दिसून येत आहे. सोशल मीडियासह इतर मार्गाने नवरात्रातील रंगांचे वेळापत्रक आधीच सर्वांकडे पोहोचले असून, त्यानुसार आपापले वॉर्डरोब तपासत पोशाख क्रमवार लावून ठेवणे, त्यावरील मॅचिंग दागिने पाहून ठेवणे, नसलेल्या रंगाची साडी व ड्रेस खरेदी करणे, मैत्रिणी, नातेवाइकांशी त्याबाबत चर्चा करणे, आॅफिस, कंपनी याबरोबरच दर्शन, यात्रा, भजन आदी ठिकाणी जाण्याचे नियोजन यावर भर दिला जात आहे. दुकानांमध्येही नवरात्रीचे रंग असणाºया साड्या, ड्रेस आकर्षकपणे डिस्प्ले केलेले पहायला मिळत आहे. मॅचिंग दागिने, बांगड्या, पादत्राणे, पर्स आदींची खरेदीही जोरात असून, काहींनी मेकअपचेही नियोजन केले आहे. महिलावर्गासाठी आनंदाची पर्वणी असून, या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे नियोजन महिलावर्गात दिसून येत आहे. त्यामुळे नवरात्रात सर्वत्र एकरंगी दृश्य पहायला मिळणार आहे. दररोज एकाएका रंगात सर्वच महिला दांडिया खेळताना दिसणार आहेत.