महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:56 AM2019-07-18T00:56:45+5:302019-07-18T00:57:14+5:30
नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
नाशिक : नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अन्य चार समित्यांमध्ये शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले असून, त्यामुळे युतीतच पदांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी बुधवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, भाजपाचे बहुमत असतानाही शिवसेनेनेदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधार समिती तसेच वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आव्हान केले नाही. मात्र शिवसेनेने मात्र अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक समितीत एकूण नऊ सदस्य असून त्यातील पाच सदस्य भाजपाचे असल्याने समितीवर याच पक्षाचे वर्चस्व आहे, परंतु तरीही सेनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. देशात आणि राज्यात महापालिकेची युती आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतदेखील युती व्हावी यासाठी सेनेलाही सत्तेचा वाटा मिळावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. समित्या आणि त्यात अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- महिला व बालकल्याण - सभापतिपद- हेमलता कांडेकर (भाजपा), उपसभापती- रंजना प्रकाश बोराडे (शिवसेना), डॉ. सीमा ताजणे (भाजपा).
वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व डॉ. दीपाली कुलकर्णी (दोघेही भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व पूनम धनगर (भाजप).
शहर सुधार समिती- सभापती- सुदाम डेमसे (शिवसेना), अनिल ताजनपुरे (भाजपा), उपसभापती- सुदास डेमसे (शिवसेना), छाया देवांग (भाजपा).
विधी समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), सुमन सातभाई (भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे व सूर्यकांत लवटे (शिवसेना), नीलेश ठाकरे (भाजपा).