महिला बालकल्याण निवडणूक २१ रोजी
By admin | Published: October 9, 2014 12:58 AM2014-10-09T00:58:03+5:302014-10-09T02:03:49+5:30
महिला बालकल्याण निवडणूक २१ रोजी
नाशिक : नाशिक महापालिकेच्या बदललेल्या राजकीय समीकरणात अडकलेल्या महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकांना २१ तारखेचा मुहूर्त लागला असून, यंदा सभापतींबरोबर उपसभापतिपदाचीही निवडणूक होणार आहे.
महिला आणि बालकल्याण या विषयांसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडीकडे सर्वच पक्षांचे लक्ष असते. त्यामुळे या समितीवर आपल्याच पक्षाचा सभापती असावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते; परंतु यंदा महापौरपदाच्या निवडणुकीत बदललेली समीकरणे पाहता मनसेची सदस्यसंख्या सर्वाधिक असतानाही पक्षाकडे या समितीचे सभापतिपद येते की नाही या शक्यतेने गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. दोन महिन्यांपूर्वीच या विभागासाठी सदस्यांची निवड झाली होती. त्यानंतर आलेल्या आचारसंहितेत आणि बदललेल्या राजकीय समीकरणात ही निवडणूक अडकून पडली होती.
महापौरपदाच्या निवडीनंतर मनसेला राष्ट्रवादी ाअणि कॉँग्रेसने साथ दिल्याचे चित्र असुन तेच समिकरण कायम राहिले तर महिला आणि बालकल्याण समितीवरही मनसे आघाडीचाच झेंडा फडकू ाकतो. नऊ सदस्य असलेल्या या विभागात पूर्वी फक्त सभापतिपदाचीच निवड होत होती. यंदा त्यात सुधारणा करण्यात येऊन उपसभापतिपदाचीही निवड करण्यात येणार आहे. दोन महत्त्वाची पदे असल्याने या निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या निवडणुकीचा बाकीचा कार्यक्रम दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. त्यानुसार अर्ज वाटप आणि माघारीची प्रक्रिया होईल. (प्रतिनिधी)