सर्वसाधारण जागांवर महिलांचीही दावेदारी
By admin | Published: October 15, 2016 02:01 AM2016-10-15T02:01:25+5:302016-10-15T02:06:46+5:30
चुरस वाढणार : काही नगरसेविकांची निवृत्ती शक्य
नाशिक : महापालिका निवडणुकीत ३१ प्रभागांमध्ये १२२ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी सर्वसाधारण जागांवर काही महिलांनी दावेदारी सांगण्यास सुरुवात केल्याने पुरुषांबरोबरीने महिलांच्या लढतीमुळे चुरस वाढणार आहे. दरम्यान, विद्यमान नगरसेविकांमधील काही नगरसेविका निवृत्ती पत्करण्याची शक्यता असून, त्यांचा वारसा चालविण्यासाठी कुटुंबीयातीलच घटक पुढे येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
यंदा होणाऱ्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली असून, ३१ प्रभाग मिळून १२२ सदस्य निवडून जाणार आहेत. त्यात ३० जागा सर्वसाधारण महिला, नऊ जागा अनुसूचित जाती, पाच जागा अनुसूचित जमाती आणि १७ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिलांसाठी ३२ जागा राखीव होत्या. त्यात यंदा दोनने घट झाली आहे, तर अनुसूचित जाती व जमाती यांची प्रत्येकी एक जागा वाढली आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा ‘जैसे थे’ आहेत. मागील निवडणुकीत ६३ महिला महापालिकेवर निवडून गेल्या होत्या. त्यात दोन महिलांनी पुरुषांबरोबर लढत देत विजयश्री खेचून आणली होती. प्रभाग पाचमधून अनुसूचित जमाती या आरक्षित जागेवर भाजपाच्या रंजना भानसी यांनी, तर प्रभाग २४ मधून मनसेच्या सुजाता डेरे यांनी सर्वसाधारण जागेवर लढत विजय संपादन केला होता. यंदा चार सदस्यीय प्रभागरचना, इच्छुकांची वाढती संख्या, पक्षीय पॅनलमध्ये सहभागासाठी तीव्र स्पर्धा यामुळे प्रामुख्याने सर्वसाधारण जागांवर चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यात सर्वसाधारण जागांवर काही आजी-माजी मातब्बर महिला नगरसेवकांनी दावेदारी सांगण्यास सुरुवात केल्याने पुरुष इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. सध्या व्हॉटस्अॅपवर दावेदारीचे संदेश फिरत असल्याने संबंधित प्रभागांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)