पक्षांतरात महिला नगरसेवकांची आघाडी

By admin | Published: October 21, 2016 02:22 AM2016-10-21T02:22:55+5:302016-10-21T02:28:11+5:30

१७ महिलांची सोडचिठ्ठी : सत्ताधारी मनसेला सर्वाधिक झटका

Women's corporators' lead in the party | पक्षांतरात महिला नगरसेवकांची आघाडी

पक्षांतरात महिला नगरसेवकांची आघाडी

Next

नाशिक : महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, तशा त्या राजकारणात पक्षांतरातही मागे नसल्याचे महापालिकेत गेल्या वर्षभराच्या घडामोडीवरून समोर आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३० नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यात सर्वाधिक १७ महिला नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामध्येही मनसेच्या एकूण २२ पैकी १२ महिला नगरसेवकांनी पक्षांतर करत पक्षाला झटका दिला आहे. दरम्यान, सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीला गळती सुरूच असून, दिवाळीनंतर पक्षांतराचे आणखी काही फटाके फुटण्याची चर्चा सुरू आहे.
सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत १२२ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात ६३ महिलांचा समावेश होता. ६१ महिला नगरसेवक या राखीव जागांवर निवडून आल्या होत्या, तर अन्य दोन महिला या पुरुषांशी लढत देत निवडून आल्या होत्या. मनसेचे एकूण सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते. त्यात २२ महिला नगरसेवकांचा समावेश होता. दरम्यान, गेल्या दीड-दोन वर्षांपासून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यात तब्बल १७ महिला नगरसेवकांचा समावेश आहे. मनसेच्या सुरेखा नागरे, रत्नमाला राणे, शोभना शिंदे, उषा शेळके, लता टिळे, मीना माळोदे यांनी शिवसेनेत तर डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव, अर्चना थोरात आणि संगीता गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
याशिवाय, राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे, माकपच्या नंदिनी जाधव, राष्ट्रवादीच्या कल्पना चुंभळे यांनी सेनेत तर कॉँग्रेसच्या लता पाटील व राष्ट्रवादीच्या रुपाली गावंड यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. सत्ताधारी मनसेतील ७० टक्के महिला नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आता मनसेमध्ये दहा महिला नगरसेवक उरल्या असून त्यामध्ये सुरेखा भोसले, सुजाता डेरे, मेघा साळवे, रेखा बेंडकोळी, सुमन ओहोळ, सुवर्णा मटाले, कांचन पाटील, शीतल भामरे, अर्चना जाधव, सविता काळे यांचा समावेश आहे. दरम्यान, सेना-भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या आणखी असून, दिवाळीनंतर पुन्हा प्रवेश सोहळे रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Women's corporators' lead in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.