महिलांचा हंडा मोर्चा
By admin | Published: May 27, 2015 11:53 PM2015-05-27T23:53:51+5:302015-05-27T23:57:42+5:30
नागापूर ग्रामपंचायत : ग्रामस्थांचा संताप
मनमाड : वर्षभरापासून नागापूर येथील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचा आरोप करत संंतप्त महिलांनी नागापूर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
राज्यातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नागापूर ग्रामपंचायीची पाणीपुरवठा योजना एप्रिल २०१४ पासून बंद आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही योजना सुरू होत नाही. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागापूरमध्येही पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी तीन वेळा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी संतप्त महिलांनी ग्राम पंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रा.प. कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर पुष्पा पवार, मनीषा गांगुर्डे, भाग्यशाली कापसे, जया दखने, निर्मला गोडसे, अंजनाबाई धुरड, सत्यभामा वाघ, आशा खुरसणे, सखुबाई मोरे यांच्यासह अन्य महिलांची सह्या आहेत. (वार्ताहर)