महिला रुग्णालय वही बनायेंगे, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचा निर्धार पक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:22 PM2017-11-04T17:22:14+5:302017-11-04T17:26:57+5:30
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच चार वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप
नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गेल्या चार वर्षांपासून सदरचे रुग्णालय उभे राहण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाबाबत कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही फरांदे यांनी दिला आहे.
स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदार आमनेसामने उभे ठाकले आहे. माजी आमदार वसंत गिते व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी रुग्णालयाला उघडपणे विरोध दर्शविला तर प्रभागातील नागरिकांनीही एकत्र येत जनहित याचिका दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या साऱ्या घटना-घडामोडींनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. फरांदे यांनी सांगितले, भाभानगरची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि हाकेच्या अंतरावर बसस्थानके आहेत. परिसरातील महिलांना सदर रुग्णालय दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे बनणार आहे. बिटको रुग्णालय व शासकीय रुग्णालयात होणाऱ्या गर्दीमुळे सामान्य कुटुंबातील महिलांना उपचार मिळण्यात गैरसोयीचे होते. त्यामुळे सदर शंभर खाटांचे रुग्णालय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाची निविदाप्रक्रिया व कार्यादेश होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सदर रुग्णालय प्रलंबित राहिल्याचा आरोपही फरांदे यांनी केला. सामान्य महिलांसाठी उपयोगी ठरणाऱ्या या रुग्णालयाबाबत आपल्याला कोणतेही राजकारण आणायचे नाही आणि कुणी राजकारण करूही नये. सदर रुग्णालयाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज पसरविले जात आहेत परंतु, त्याठिकाणी शवागृह अथवा पोस्टमार्टेमसारखी सुविधा राहणार नाही. रुग्णालयासाठी किमान ८ हजार चौ.मी. जागेची आवश्यकता आहे. टाकळीरोड येथे रुग्णालयासाठी केवळ १९२० चौ.मी. जागा उपलब्ध होणार होती. त्यामुळे सदर जागेत रुग्णालय उभारता येणे शक्यच नसल्याचा दावाही फरांदे यांनी केला. त्यासाठी फरांदे यांनी सदर जागेचा नकाशाच पत्रकारांसमोर ठेवला.
...तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल
सामान्य गोरगरीब महिलांसाठी होणाऱ्या या रुग्णालयाला कुणी विरोध करत असेल तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल, असा इशाराही फरांदे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून आपण या प्रकरणात संयम बाळगून आहे. भाजपात शिस्तीला महत्त्व दिले जाते. अन्यथा मलाही आक्रमक होता आले असते. परंतु, कुणीही यात राजकारण आणू नये. जनतेसाठीच सदर प्रकल्प राबविला जात असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहावे, असा सल्लाही फरांदे यांनी दिला.