दाणी यांच्या प्रेरणेनेच महिलांचा वाढला सहभाग : रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:13 AM2019-01-24T01:13:59+5:302019-01-24T01:14:23+5:30
ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई दाणी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित व स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले. त्यांच्या प्रेरणेने सर्वसामान्य स्त्रियांचा विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रि य सहभाग वाढला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
नाशिक : ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई दाणी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित व स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले. त्यांच्या प्रेरणेने सर्वसामान्य स्त्रियांचा विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रि य सहभाग वाढला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे शांताबाई दाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका प्रा. डॉ. कविता साळुंखे होत्या. जगाच्या इतिहासात सर्वत्र पुरु षप्रधान संस्कृती स्त्रियाचे शोषण करत आलेली आहे. भारतासारख्या देशात धर्म, रूढी-परंपरा व रीतीरिवाज यामुळे तर स्त्रियांचे अधिक शोषण झाले. ही विषमता तीव्र असतानाच्या काळात शांताबाई दाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होत व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विविध सामाजिक चळवळींमध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटविला.
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या काही काळ सदस्य असताना त्यांनी स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ही पोकळी प्रकर्षाने जाणवत असल्याचेही डॉ. कसबे म्हणाले. प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी प्रास्ताविकात शांताबाई दाणी या मुक्त विद्यापीठाच्या प्रथम मानद डी. लिट पदवीधारक असल्याचे सांगितले.