पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:29 AM2018-04-28T00:29:02+5:302018-04-28T00:29:02+5:30
येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे
पाटोदा : येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही कसरत करावी लागत आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे पिण्यासाठी तरी पाणी मिळेल का नाही, असा प्रश्न आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यात आज २९ गावे व २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत रोजच भर पडत आहे. गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विहिरी कूपनलिकेची पातळी खालावल्याने अनेक जलस्रोत पाण्याअभावी बंद पडले आहेत. तसेच नागरिकांसह मुक्या जनावरांना तसेच पशुपक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. असे असतानाही शेतकºयांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे. मात्र पाणी लागत नाही एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार अशी अवस्था झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही नदी-नाले, ओढे, साठवण तलाव पाण्याने भरलेच नाही त्यामुळे पाण्याचा ठणठणात आहेत. त्यातच पाण्याच्या व्यवस्थेसाठी टँकरच्या, कूपनलिका अधिग्रहणाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील साठवण तलावातील पाण्याचे योग्य ते नियोजन न केल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात
येवला तालुक्यात विहिरी, कूपनलिकांची पातळी कमालीची खालावल्याने व ना दुरुस्त कूपनलिकांची संख्या अधिक वाढल्याने पाणीटंचाईत भरच पडत आहे. तालुक्यात दूषित जलस्त्रोतांचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो. येवला तालुक्यात विहिरी, विंधनविहिरी आदी स्रोतांचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापर असतात. मात्र तालुक्यात अस्तित्वात असणाºया हातपंपाचे पाणी दूषित, क्षारयुक्त झालेले आहे असे पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई व दूषित जलसाठा यामुळे ग्रामीण भागातील नागरिकदेखील जारचे, फिल्टर केलेले पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत शुद्ध ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जलदुतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.