दारूबंदीसाठी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:16 AM2019-06-21T01:16:31+5:302019-06-21T01:16:56+5:30
माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली.
एकलहरे : माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली.
परिसरात अवैध दारूची विक्री वाढली असल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. यावेळी महिलांनी आपली कैफियत मांडताना सांगितले की, दारुड्यांचा त्रास वाढला आहे, व्यसनाच्या विळख्यात तरुण पिढी व अल्पवयीन मुले अडकली आहेत. दारूमुळे घरदार उद्ध्वस्त होत आहेत. माडसांगवी गाव व परिसरात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे.
दारूधंदे कायमचे बंद होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवू, असा निर्धारही यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केला. यावेळी महिलांनी थेट गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारूबंदीसाठी आंदोलन केले.
४आंदोलक महिलांनी सरपंच रेखाताई घंगाळे, उपसरपंच मीराताई पेखळे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिरामण पेखळे यांच्यासमोर दारूमुळे होणाऱ्या त्रासाबाबत कैफियत मांडली.