स्त्री शक्ती धावली नारीच्या मदतीला; ओढण्यांचा दोर करुन सोडला गोदापात्रात
By azhar.sheikh | Published: August 11, 2018 01:28 PM2018-08-11T13:28:23+5:302018-08-11T13:39:56+5:30
रामवाडी पुलावरील वर्दळ अचानक स्थब्ध झाली. महिला, तरुणी पुलावर जमल्या. याचवेळी प्रसंगावधान दाखवून महिलांनी तत्काळ जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्यांच्या ओढण्या जमा केल्या आणि ओढण्या बांधून दोर केला व नदीपात्रात फेकत तीचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
अझहर शेख
नाशिक : नाशिकमधील पंचवटीतील रामवाडीमध्ये जाणा-या रस्त्यावरील गोदापात्राच्या पुलाजवळ नदीपात्रात बुडत असलेल्या एका महिलेच्या मदतीला स्त्री शक्ती धावून आली. जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्या सर्वांनी ओढण्या काढून देत दोर बनविला अन् ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे ओढणीचा दोर गोदापात्रात टाकला.
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे रामवाडीकडे जाणा-या घारपुरे घाटाच्या पूलावर वर्दळ सुरू होती. यावेळी पुलावरून अचानकपणे एका महिलेने गोदापात्रात आत्महत्त्येसाठी उडी घेतली. ही बाब काही महिलांच्या लक्षात आली. त्यांनी तीच्या मदतीसाठी ‘हाक’ दिली. रामवाडी पुलावरील वर्दळ अचानक स्थब्ध झाली. महिला, तरुणी पुलावर जमल्या. याचवेळी प्रसंगावधान दाखवून महिलांनी तत्काळ जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्यांच्या ओढण्या जमा केल्या आणि ओढण्या बांधून दोर केला व नदीपात्रात फेकत तीचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. यावेळी परिसरातील दुसºया तरुणाने नायलॉनचा दोरखंड आणून तोही बुडणा-या महिलेच्या दिशेने फेकला. घटनेची माहिती पंचवटी अग्निशामक दलाला मिळताच अवघ्या काही मिनिटांत बंब पुलावर पोहचला. जवानांनी बंबांवरुन बोट काढण्याची तयारी सुरू केली असता दुस-या एका धाडसी तरुणाने गोदापात्रात सूर लगावला आणि पोहत जाऊन बुडणाºया महिलेचे डोके पाण्याबाहेर काढून धरले. हा सर्व प्रकार बघून पानवेली काढण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांनी तत्काळ त्यांची बोट नदीपात्रात बुडत असलेल्या महिलेच्या दिशेने वेगाने नेली. तत्काळ त्या तरुणांनी महिलेला उचलून बोटीत टाकले आणि बोट जुन्या गोदापार्कच्या बाजूने काठालगत आणली. अग्निशाामक दलाच्या जवानांनी अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या महिलेला बोटीतून बाहेर घेत पोलीस कर्मचारी रोशनी भामरे यांना सुचना करत कृत्रिम ‘सीपीआर’ दिला. यावेळी महिलेच्या तोंडात गेलेले पाणी काही प्रमाणात बाहेर काढण्यास जवानांना यश आले. तत्काळ रुग्णवाहिकेतून तीला बेशुध्दावस्थेत निमाणी जवळील एका खासगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले आहे. उपस्थित सर्व नाशिककरांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि आपल्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद सर्वांच्याच चेहºयांवर यावेळी झळकला. महिलेचा जीव वाचला असून तीच्यावर उपचार सुरू आहे. प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.