‘बॉर्डर’वरील जंगल संरक्षणासाठी महिला वनरक्षकांचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:51 AM2019-03-11T00:51:27+5:302019-03-11T00:53:39+5:30
जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे.
नाशिक : जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे. रात्रपाळीची गस्त असो किंवा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळे रचणे असो, अशा सर्वच कारवाईत महिला वनरक्षक अग्रेसर आहेत.
नाशिक जिल्हा आदिवासी तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल वनपरिक्षेत्र असो अथवा पेठ तालुक्याचे वनपरिक्षेत्रात आदिवासी दुर्गम भाग मोठा आहे. यामधील बहुतांश भाग गुजरात राज्याच्या सीमेला लागूनच आहे. या भागातील साग, खैर, अर्जुनसादडा यासारख्या मौल्यवान वृक्षप्रजातीचे जंगल महाराष्टÑाच्या हद्दीत या भागात अस्तित्वात आहे. या जंगलांवर काही स्थानिकांच्या मदतीने गुजरातमधील तस्करांच्या टोळ्या घुसखोरीचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हा प्रयत्न वनविभागातील सहा महिला वनरक्षकांचे पथक हाणून पाडत आहे.
गुजरातला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी महिला वनरक्षक प्रयत्नशील आहेत. या भागात खैर, सागाची प्रजाती मोठ्या प्रमाणावर असून, गुजरात राज्याची सीमा अवघ्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असल्याने तस्करी करणाऱ्या टोळ्या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शिरकाव होतो. महिला वनरक्षक जनप्रबोधन करत आपले ‘नेटवर्क’ बळकट करण्यावर भर देत आहेत.
या गावांचा परिसर अतिसंवेदनशील
४महाराष्टÑ-गुजरात सीमेला लागून असलेल्या हरसूल वनपरिक्षेत्रातील खडकओहोळ, ओझरखेड, देवडोंगरी-देवडोंगरा, बेरवळ, धायटीपाडा, वीराचा पाडा, चिंचओहोळ या आदिवासी गाव-पाड्यांचा परिसर अधिक संवेदनशील मानला जातो. या गावांच्या हद्दीत असलेल्या जंगलांमध्ये गुजरातकडून येणाºया तस्करांच्या टोळ्या काही स्थानिक आदिवासींना पैशांचे आमिष व अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करत वृक्षसंपदेवर रात्रीच्या सुमारास घाव घालतात.
‘सीमा सुरक्षा’ बैठका नावालाच
४नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हरसूल, सुरगाणा, उंबरठाण परिक्षेत्राची हद्द गुजरात सीमेला लागून आहे. यामुळे घुसखोरी रोखण्यासाठी गुजरात व नाशिक वनविभागाकडून सीमा सुरक्षेसाठी दरवर्षी संयुक्त बैठका घेतल्या जातात. मात्र सीमा सुरक्षेचा मुद्दा आजही ‘जैसे-थे’ आहे. तस्करांचा पाठलाग करताना अनेकदा गुजरात वनविभागाच्या वनरक्षकांकडून नाशिकच्या वनरक्षकांना आवश्यक तसा ‘बॅकअप’ पुरविला जात नाही, हेच वास्तव आहे.