नागापूरच्या मातीत रंगली ‘लाख’मोलाची कुस्ती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:02 PM2017-08-20T23:02:08+5:302017-08-21T00:21:41+5:30
नागापूर, ता. नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. शेवटची लाखमोलाची कुस्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व पुण्याच्या योगेश पवार यांच्यामध्ये लावण्यात आली होती
मनमाड : नागापूर, ता. नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. शेवटची लाखमोलाची कुस्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व पुण्याच्या योगेश पवार यांच्यामध्ये लावण्यात आली होती. दोन्ही मल्ल जिंकण्यासाठी झटत असताना एका खेळाडूचा स्नायू ताणला गेल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात येऊन एक लाख रुपयांचे बक्षीस दोघांमध्ये विभागून देण्यात आले. महाशिवरात्रीला यात्रेनिमित्त भरविण्यात येणाºया कुस्त्यांची दंगल काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. माजी आमदार संजय पवार यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे सुरेशबाबा पाटील, अद्वय हिरे, दासाहेब जाधव, माजी आमदार अनिल अहेर, तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, मविप्र संचालक दिलीप पाटील, नाना शिंदे, उत्तम गडाख आदींच्या उपस्थितीत कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला. कुस्तीपटंूच्या डावपेचांनी उपस्थित कुस्तीपटूंच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अविनाश फडोळ यांनी उत्कृष्ट समालोचन करीत उपस्थितांची मने जिंकली. पंच कमिटीतील माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, अशोक पवार, राजेंद्र वाल्मीक पवार, छबू सोमासे, गोरख कदम, रघुनाथ सोमासे, सुधाकर पवार, प्रल्हाद पवार, शिवाजी पवार, सूरज पवार, कमलेश सांगळे आदींनी विशेष परिश्रम घेत यशस्वीपणे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले.