शहांच्या वक्तव्याने युतीतील दरी रुंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:21 AM2019-01-08T07:21:14+5:302019-01-08T07:28:55+5:30

सेना म्हणते गुजरातींमध्ये नाही दम; भाजपाची स्वबळाची तयारी पूर्ण

With the words of Shah, the gap between the alliance has increased | शहांच्या वक्तव्याने युतीतील दरी रुंदावली

शहांच्या वक्तव्याने युतीतील दरी रुंदावली

googlenewsNext

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला आहे. स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या गुजराती नेत्यामध्ये सेनेला उचलून पटकण्याचा दम नसल्याची खोचक प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, लागून असलेल्या धुळे मतदारसंघातूनही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाकडे दोन, तर सेनेकडे एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी आगामी निवडणुकीत युती होणार की नाही, याविषयी अनिश्चितता आहे. सेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असला, तरी भाजपा मात्र अजूनही युतीच्या आशेवर असतानाच लातूर येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सेनेला डिवचणारे वक्तव्य केल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उचलून पटकण्याची भाषा भाजपाने केल्यामुळे सेनेनेही तितकेच उसळून प्रतिक्रिया दिली असून, गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून टाकण्याचे दम नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना घराघरात पोहोचली असून, पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी यापूर्वीच युती होणार नसल्याचे जाहीर केलेले असताना उचलून टाकण्याइतका दम असलेल्या भाजपाने युतीसाठी सेनेला गळ घालण्याचे कारण काय, असा सवालही केला जात आहे. दुसरीकडे भाजपानेदेखील स्वबळावर लढण्याइतपत ताकद जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात निर्माण केली असून, शिवसेनेने युती केली, तर त्यांचाच फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाने तीनही लोकसभा मतदारसंघात तयारी पूर्ण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. शिवसेना युती करणार असेल, तर भाजपाच्या ताकदीचा त्यांना फायदाच होईल. अन्यथा भाजपा स्वबळावर लढण्यास तयार आहे. तशा सूचना पक्ष कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत.
- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा

Web Title: With the words of Shah, the gap between the alliance has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.