त्रकृषी सहायकांचे काळ्या फिती लावून काम
By admin | Published: June 15, 2017 12:53 AM2017-06-15T00:53:09+5:302017-06-15T00:53:38+5:30
त्र्यंबकेश्वर : आकृतिबंध तयार नसल्याचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : राज्याच्या कृषी विभागाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून, कृषी विभाग व मृद, जलसंधारण विभाग वेगळा करण्यात आला आहे. त्यासाठी वेगळे मंत्रालय तयार करण्यात आले आहे. कृषी सहायकांना मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी नवीन विभागात कोणते काम करायचे आहे त्या विभागासाठी अजून आकृतिबंध तयार नाही. यामुळे कृषी सहायकांना काहीच माहीत नसल्याने प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
बुधवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आकृतिबंधाबरोबरच कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावीत, नवीन आकृतिबंधात कृषी सहायकाचे पदनाम कृषी अधिकारी म्हणून करण्यात यावे, पदोन्नतीसाठी परीक्षेची अट घातली आहे त्यात कालापव्यय होईल म्हणून ती काढून टाकावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षणसेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास महिनाभर वेगवेगळ्या आंदोलनाचे टप्पे असतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष आबासाहेब आटोळे, राजेंद्र काळे, तालुका कार्याध्यक्ष केवळ पवार, राज्य महिला प्रतिनिधी राजश्री जाधव, जालिंदर बारे, भाऊसाहेब थेटे, पंकज भदाणे, राजेंद्र जाधव, सुधीर सूर्यवंशी, संदीप पठारे, ज्ञानदेव हांडे, दिलीप वाघेरे आदी उपस्थित होते.१० जुलैपासून काम बंददि. १२ ते १४ जून काळी फीत, १५ ते १७ जून लेखणी बंद,
दि. १९ जिल्हा अधीक्षक कृषी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन, दि. २१ ते २३ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, दि. २७ ते १ जुलै विभागीय कृषी सहसंचालक व आयुक्त कृषी पुणे यांच्या कार्यालयावर धरणे मोर्चा व निदर्शने, तर दि. १० जुलैपासून बेमुदत काम बंद करण्यात येणार आहे.