पेठ तालुक्यात ५ हजार मजुरांच्या हातांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:52 PM2020-06-07T22:52:05+5:302020-06-08T00:32:55+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.
पेठ : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.
कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या मजुरांना गावातच काम मिळाल्याने साथरोग संकटात अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी लॉकडाऊनच्या काळातही सरपंच, ग्रामसेवक व शासकीय यंत्रणेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्कसाधून ३५७ कामांवर ५१९१ स्थानिक मजुरांना काम मिळवून देण्याबाबत नियोजन केले. योग्य खबरदारी व कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यात आल्या असून, मजुरांना ग्रामपंचायत निधीतून मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात पेठ तालुका अव्वल ठरला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुरांना कामाची आवश्यकता लक्षात घेऊन पाच हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अजूनही मागणीप्रमाणे कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, पेठ